Join us

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बिग बॉसमधील या स्पर्धकाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:43 IST

बसमध्ये चढून गर्दीत महिलांचे लैंगिक शोषण करायचो अशी कबुली दिल्याने बिग बॉसमधील एका सदस्याला घराच्या बाहेर काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्रवणने कबूल केले की, मी कॉलेजमध्ये असताना बसमध्ये चढून महिलांचे लैंगिक शोषण करायचो. कमल हसन यांनी त्या विधानावर काहीही विरोध न दर्शवता उलट ते त्यावर हसले आणि उपस्थित प्रेक्षकांनी देखील यावर हसत प्रतिसाद दिला.

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असते. बिग बॉस हिंदी भाषेतील असो वा मराठीतील वा कोणत्याही दाक्षिणात्य भाषेतील, तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला असतो. बिग बॉस तामीळ ३ या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या एका विधानामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 

सोमवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या बिग बॉस तमीळच्या भागामध्ये श्रवणनला बिग बॉसच्या कनफेशन रूममध्ये बोलवण्यात आले आणि त्याला घराच्या बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बिग बॉसने त्याला सांगितले की, विकेंडच्या एपिसोडमध्ये तू महिलांबाबत जे काही विधान केलेस ते अतिशय वाईट होते. तू या विधानासाठी दुसऱ्या दिवशी माफी देखील मागितलीस. पण नॅशनल टिव्हीवर महिलांबाबत अशाप्रकारे बोलणे योग्य नाहीये. बिग बॉसची टीम अशी कोणतीही गोष्ट खपून घेणार नाही. आज तामिळनाडूच नव्हे तर देशभरातील लोक बिग बॉस तमीळ हा कार्यक्रम पाहात आहेत. तुझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच तुला घराच्या बाहेर जावे लागणार आहे.

बिग बॉस तमीळ ३ या कार्यक्रमात विकेंडच्या एका भागात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कमल हासन स्त्रियांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना अनेकवेळा लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते याबाबत सांगत होते. त्यावर श्रवणने कबूल केले की, मी कॉलेजमध्ये असताना बसमध्ये चढून गर्दीत महिलांचे लैंगिक शोषण करायचो. कमल हसन यांनी त्या विधानावर काहीही विरोध न दर्शवता उलट ते त्यावर हसले आणि उपस्थित प्रेक्षकांनी देखील यावर हसत प्रतिसाद दिला. या सगळ्या प्रकारामुळे सोशल मीडियावर बिग बॉस तमीळच्या टीमला आणि कमल हासन यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. लैंगिक शोषण हा एक गुन्हा असून अशाप्रकारे त्याची खिल्ली उडवणे चुकीचे असल्याचे लोकांचे म्हणणे होते. 

गायिका चिन्मयीने ट्वीट करत या घटनेवर निषेध नोंदवला होता. तिने ट्वीटमध्ये म्हटले होते की, तामीळ भाषेच्या एका वाहिनीवर एक स्पर्धकाने कबूल केले की, तो महिलांचे बसमध्ये लैंगिक शोषण करायचा आणि त्यावर लोक टाळ्या वाजवतात. हा काय जोक आहे का की लोकांनी त्यावर टाळ्या वाजवायला?

 

लोकांच्या प्रतिक्रिया पाहाता श्रवणनला कनफेशन रूममध्ये बोलावून माफी मागायला सांगण्यात आले होते. पण त्यानंतरही लोकांचा राग कमी न झाल्याने त्याला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता त्याला घरातून बाहेर काढल्यानंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

 

टॅग्स :बिग बॉस