Join us

​'कुलस्वामिनी' मालिकेतील संग्राम साळवीचा हा संवाद होतोय लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 15:16 IST

'देवयानी' मालिकेतील संग्राम विखे पाटीलचा 'तुमच्यासाठी कायपण' हा संवाद प्रचंड गाजला होता. अगदी रस्त्याने येता-जाताही हे वाक्य सहज कानावर ...

'देवयानी' मालिकेतील संग्राम विखे पाटीलचा 'तुमच्यासाठी कायपण' हा संवाद प्रचंड गाजला होता. अगदी रस्त्याने येता-जाताही हे वाक्य सहज कानावर पडायचे. तुमच्यासाठी कायपण या संवादावर बेतलेली अनेक फेसबुक पेजेस देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. तुमच्यासाठी कायपण ही संग्रामची ओळखच बनली होती. आता संग्रामचा अजून एक संवाद लोकप्रिय होऊ लागला आहे. कुलस्वामिनी मालिकेतला 'राजस बोलला, विषय संपला!' हा संवाद प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.कुलस्वामिनी ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरू लागली आहे. रेणुका मातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. या मालिकेत संग्राम साळवी राजस देवधर ही भूमिका साकारतो आहे. राजसच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहे. लहानपणीच त्याची आई गेली. वडिलांशी त्याचे कधी पटलेच नाही आणि वडिलांनी त्याला कधी समजूनही घेतले नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो नेहमी वागतो. मात्र, त्याच्या मनात मायेचा ओलावाही आहे. संग्रामला 'राजस बोलला, विषय संपला' असा खणखणीत संवाद मिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत.मालिकेचे लेखक शिरीष लाटकर सांगतात, 'राजस ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडत आहे. प्रत्येक गोष्टीला तो थेट भिडणारा आहे. त्याच्या मनात एक आणि ओठावर एक असे काहीही नाही. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेसाठी काहीतरी तकिया कलाम असावा असे वाटत होते. त्यातूनच 'राजस बोलला, विषय संपला' हा संवाद सुचला. या संवादाने ही व्यक्तिरेखा अजून उठावदार झाली आहे. संग्रामने त्याच्या खास शैलीत ही व्यक्तिरेखा अधिक फुलवली आहे.'