Join us  

गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी आता दिसते अशी, या मालिकेद्वारे करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 6:30 AM

गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे.

ठळक मुद्देआपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सलोनी टीव्ही मालिकांपासून काही काळ दूर गेली होती. आता ती यह जादू है जिन्न का या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

मनोरंजन क्षेत्रात गंगुबाई या नावाने प्रसिद्ध असलेली बालकलाकार सलोनी दैनी लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘यह जादू है जिन्न का’ या आगामी मालिकेत दिसणार आहे. या आगामी मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात परिकथेची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. हा प्रोमो प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या प्रोमोमध्ये आपल्याला एक आवाज ऐकायला मिळत आहे. हा आवाज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गंगूबाईचा म्हणजेच बालकलाकार सलोनी दैनीचा आहे. ती या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे.

एखाद्या मालिकेच्या प्रोमोसाठी एखाद्या बालकलाकारने आपला आवाज देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या या अनुभवाविषयी सलोनी सांगते, “मला जेव्हा या मालिकेतील भूमिकेविषयी विचारण्यात आले, तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता या मालिकेसाठी होकार दिला. मी लहानपणापासून परिकथा खूप ऐकल्या आहेत आणि या मालिकेतील भूमिका म्हणजे माझं बालपणीचं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.”

आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सलोनी टीव्ही मालिकांपासून काही काळ दूर गेली होती. आता ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्या या पुनरागमनाबाबत सध्या ती खूपच उत्सुक आहे. याविषयी ती सांगते, “पहिल्या काही भागांमध्ये मी निवेदन करणार असून नंतर मी अमनच्या (विक्रमसिंह चौहान) बहिणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.”

फोर लायन्स फिल्म्सच्या गुल खान यांनी या मालिकेची निर्मिती केली असून त्यात अमन या एका तरुण आणि देखण्या नबाबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमनवर एका दुष्ट शक्तीचे (जिन्न) सावट पडलेले असते. एका तवायफची मुलगी असलेल्या रोशनीकडे (आदिती शर्मा) चांगल्या शक्ती असतात; पण ती या दुष्ट शक्तींच्या प्रभावाखालून अमनला बाहेर काढू शकेल का? हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका लवकरच ‘स्टार प्लस’वर सुरू होणार आहे. 

टॅग्स :सलोनी डॅनीस्टार प्लस