बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या १२ व्या सिझनची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
सलमान खान आणि बिग बॉस हे एक समीकरणच बनले आहे. आता या सिझनचे सूत्रसंचालन देखील सलमान खान करणार असून त्याने या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच शूट केला. या प्रोमोमधून प्रेक्षकांना या सिझनची थिम काय असणार आहे याविषयी कळणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सलमान खान आता नवव्या वेळी बिग बॉसचे होस्टिंग करणार आहे.
बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रोमोच्या चित्रीकरणाच्या वेळी सलमान खानने त्याच्या लोकप्रिय सिनेमातील काही प्रसिद्ध नृत्याच्या स्टेप्स त्यात समाविष्ट केल्या. तसेच त्याच्या प्रसिद्ध जवानी फिर ना आये या गाण्यातील टॉवेल स्टेपवर देखील तो नाचला. तसेच या प्रोमो मध्ये सलमान प्रख्यात बॉलीवूड सिनेमांचे अनेक पोस्टर फाडून त्यातून बाहेर पडताना दिसणार आहे. तसेच टायगर जिंदा है सिनेमातील दिल दी आ गल्लन हे गाणे सलमान खान या प्रोमोमध्ये गुणगुणणार आहे. सलमान खान नेहमीच बिग बॉसच्या प्रोमोला त्याचा एक वेगळा टच देतो. सेटवर त्याने प्रवेश केल्यापासूनच एक वेगळी एनर्जी त्याच्यात पाहायला मिळते. त्याच्यामुळे संपूर्ण युनिटलाच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. या सिझनचा प्रोमो देखील दमदार झाला असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. बिग बॉस 12 हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.