Join us  

'ही' गोष्ट करताना आजही सागर कारंडेला फुटतो घाम, पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 2:14 PM

वेगवेगळ्या भूमिका साकारायला नेहमीच आवडतात आणि त्या भूमिकेमध्ये मी स्वतःला पडताळून बघतो कि मला कितपत जमतंय. 

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

 

या मालिकेत नुकतीच अभिनेता सागर कारंडेची कॉलेजचा नवीन डीन डॉक्टर विक्रांत म्हणून एंट्री झाली. विक्रांतच मोनिकावर खूप प्रेम आहे हे प्रेक्षकांनी पाहिलं आहे. विक्रांत लवकरच त्या प्रेमाची कबुली देखील मोनिकाकडे देणार आहे. विक्रांत सगळ्यांसमोर मोनिकाला प्रपोज करणार आहे. प्रेक्षकांनी सागरला विनोदी भूमिका साकारताना पाहिलं आहे पण एक रोमँटिक भूमिका ऑन-स्क्रीन साकारताना देखील कॉमेडी कारण्याइतकंच दडपण असतं असं सागर म्हणतो.

या प्रपोजलच्या सिनसाठी त्याने तयारी कशी केली आणि कॉमेडी व रोमँटिक भूमिका साकारताना कुठली भूमिका जास्त कठीण असते याबद्दल बोलताना सागर म्हणाला, "मी पहिल्यांदाच अशी रोमँटिक भूमिका साकारतोय. विक्रांतची भूमिका खूप वेगळी आहे. 

नाटकांमध्ये मी अशा भूमिका साकारल्या असतील पण ऑन-स्क्रीन पहिल्यांदाच करतोय. विक्रांत आता मोनिकाला प्रपोज करणार आहे. या सिनसाठी तयारी म्हणाल तर विक्रांतच्या भावना मोनिकापर्यंत आणि पर्यायाने प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशा पोहोचतील याकडे मी जास्त लक्ष देतोय. माझा नेहमी असा अट्टाहास असतो कि आपण आधी केलेल्या भूमिकांपेक्षा आत्ताची भूमिका जास्त चांगल्या प्रकारे साकारली पाहिजे. मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला नेहमीच आवडतात आणि त्या भूमिकेमध्ये मी स्वतःला पडताळून बघतो कि मला कितपत जमतंय. 

विक्रांत साकारायला मला खूप आवडतंय आणि प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया माझ्या पर्यंत पोहोचत आहेत. कॉमेडी आणि रोमँटिक भूमिका म्हणाल तर दोन्ही साकारताना तितकंच दडपण असतं. मी कधीच २ शैलींमध्ये फरक नाही करत. कलाकार म्हणून स्वतःवर नियंत्रण असणं खूप महत्वाचं असतं. विनोद करताना कलाकार भरकटू शकतो किंवा वाहवत जाऊ शकतो पण एक भावना प्रधान सिन करताना त्यात भरकटून न जाता त्या भावना प्रेक्षकांपर्यंत कशा चांगल्या प्रकारे पोहोचवता येतील याकडे माझा कल असतो."