'आई कुठे काय करते' मालिकेतून रुपाली भोसलेने अमाप लोकप्रियता मिळवली. या मालिकेत रुपालीने साकारलेल्या संजना या भूमिकेचं खूप कौतुक झालं. रुपालीला या भूमिकेतून चाहत्यांचं प्रेम मिळालं. आता रुपालीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. रुपाली पुन्हा एकदा नव्या मालिकेतून झळकणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होणार आहे. जाणून घ्या.
रुपालीची नवी मालिका
स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेली 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता 'लपंडाव' ही नवीकोरी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणार आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली, ‘लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैश्यांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे."
"आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल. माझ्या लूकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे", अशी भावना रुपाली भोसलेने व्यक्त केली. लपंडाव या मालिकेची रिलीज डेट समोर आली नसली तरीही लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.