Join us

‘रामायण’ सर्वाधिक पाहिलेली मालिका नाही?  ‘वर्ल्ड रेकॉर्ड’वर प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 16:24 IST

सर्वाधिक दर्शकसंख्येचा जागतिक विक्रम वादात...

ठळक मुद्दे‘रामायण’ हा जगात सर्वाधिक पाहिलेला शो ठरल्याची बातमी दूरदर्शनने आपल्या अधिकृत सोशल अकाऊंटवरून दिली होती.

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित झाली आणि एकापाठोपाठ एक विक्रम नोंदवले गेलेत. यानंतर ‘रामायण’ने सर्वाधिक दर्शकसंख्येचा जागतिक विक्रम नोंदवल्याचा दावाही केला गेला, एका भारतीय पौराणिक मालिकेने नोंदवलेल्या या विक्रमाने अनेकजण सुखावले. पण आता या विक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवाय या निमित्ताने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.होय, ‘रामायण’ हा जगात सर्वाधिक पाहिलेला शो ठरल्याची बातमी दूरदर्शनने आपल्या अधिकृत सोशल अकाऊंटवरून दिली होती. 16 एप्रिलला प्रसारित झालेला ‘रामायण’चा एपिसोड 7 कोटी 70 लाख लोकांनी पाहिल्याचे आणि सोबत या शोने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचा रेकॉर्ड तोडल्याचे यात म्हटले गेले होते. आता मात्र ‘लाइव्ह मिंट’ने दूरदर्शनच्या या दाव्यातील हवा काढली आहे.

होय, ‘रामायण’ हा जगात सर्वाधिक पाहिला गेलेला शो ठरल्याचा दावा खोटा असल्याचे ‘लाइव्ह मिंट’ने म्हटले आहे. ‘लाइव्ह मिंट’च्या दाव्यानुसार, ‘MASH’ या अमेरिकन सीरिजचा शेवटचा एपिसोड 10 कोटी 60 लाखांवर लोकांनी पाहिला होता. त्यामुळे ‘रामायण’ जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला शो असल्याचा दावा खोटा ठरतो. MASH या अमेरिकन सीरिजचा शेवटचा एपिसोड 28 फेब्रुवारी 1983 रोजी प्रसारित झाला होता.

दूरदर्शनने केला खुलासाया संपूर्ण वादावर आता प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी खुलासा केला आहे. कुठल्या आधारावर ‘रामायण’ जगात सर्वात पाहिला गेलेला शो ठरला? या प्रश्नावर त्यांनी सांगितले, टीव्ही रेटिंग्सच्या खेळाबाहेरही अनेक लोक ‘रामायण’ पहात आहेत. जिओ टीव्ही, एमएक्स प्लेअर अशा अनेक मोबाईल टीव्ही सर्विसेसच्या माध्यमातूही लोक ‘रामायण’ पाहत आहेत. लॉकडाऊनदरम्यान 200 मिलियन म्हणजेच 20 कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी रामायण पाहिले. मी रेकॉर्ड वगैरेच्या भानगडीत पडणार नाही. पण लॉकडाऊनदरम्यान कोट्यावधी कुटुंबानी ‘रामायण’ पाहिले. लॉकडाऊनदरम्यान लोकांना त्यांच्या घरात सुरक्षित ठेवण्याचे काम या माध्यमातून आम्ही चोखपणे बजावले.

16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय होते खास?16 एप्रिलचा 'रामायण'ने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.  आता या एपिसोडमध्ये असे काय खास होते, काय दाखवले होते, असा प्रश्न काहींना पडू शकतो. तर यात लक्ष्मणासाठी संजीवनी आणायला गेलेला हनुमान संजीवनी न मिळाल्याने अख्खा कैलाश पर्वत हातावर उचलून आणल्याचे दाखवण्यात आले होते. यानंतर सुषैण वैद्य लक्ष्मणाला संजीवणी देतो आणि लक्ष्मण शुद्धीवर येतो, अशी कथा या एपिसोडमध्ये दाखवण्यात आली होती.

टॅग्स :रामायण