Join us  

अरूण गोविल वैतागले, ‘रामा’च्या फेक अकाऊंटला खुद्द मोदीही फसले...!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 11:32 AM

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ठळक मुद्देफेक अकाऊंटचा असा पर्दाफाश झाल्यानंतर अरूण गोविल यांनी एक व्हिडीओ जारी करून, स्वत:च्या अधिकृत अकाऊंटबद्दल माहिती दिली.

 कोरोना संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लोक आपआपल्या घरात आहेत. अशात फावल्या वेळात काय करावे, असा प्रश्न अनेकांना सतावत होता. यावरचा तोडगा म्हणून लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनवर पुन्हा एकदा रामायण, महाभारत या पौराणिक मालिका सुरु झाल्यात आणि लोकांनी या मालिका डोक्यावर घेतल्या. सध्या प्रेक्षक आवडीने या मालिका बघत आहेत. रामायणने तर टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. या मालिकांमधील कलाकार पुन्हा  चर्चेत आले आहेत. तूर्तास रामायणातील कलाकारांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. केवळ चर्चाच नाही तर रामायणात प्रभु रामचंद्राची भूमिका साकारणारे अभिनेते अरूण गोविल यांच्या नावाच्या बनावट सोशल अकाऊंटचे जणू पेव फुटले आहे. अरूण गोविल यांच्या अशाच एका बनावट ट्विटर अकाऊंटला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही फसले.

होय, तर त्याचे झाले असे की, रामायणाची चर्चा होताच एका फेक युजरने अरूण गोविल यांचे फेक ट्विटर अकाऊंट बनवून टाकले.   ‘अखेर मी ट्विटरवर आलोय... जय श्रीराम’ असे ट्विट @TheArunGovil  नामक  फेक ट्विटर हँडलवरून केले गेले. साक्षात ‘राम’ ट्विटरवर आलेले बघून ट्विटर युजर कमालीचे उत्साहित झाले आणि बघता बघता या अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. यानंतर  यानंतर या फेक ट्विटर अकाऊंटवर अरूण गोविल यांचा एक व्हिडीओही अपलोड केला गेला. विशेष म्हणजे,हा व्हिडीओ अपलोड करताना पीएम मोदी यांनाही टॅग केले गेले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिट दिवे, मेणबत्ती, टॉर्च पेटवा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अरूण गोविल यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. हाच व्हिडीओ गोविल यांच्या फेक ट्विटर अकाऊंटवर अपलोड केला गेला होता आणि यात पीएम मोदींना टॅग केले गेले होते. 

मग काय, खुद्द मोदीही या अकाऊंटला पाहून फसले. त्यांनी हे ट्विट अरूण गोविल यांचेच समजून त्यांचे आभार मानलेत. ‘तुमचा हा संदेश कोरोनाविरूद्ध सुरु असलेल्या लढाईच्या संकल्पाला आणखी बळ देईल,’असे मोदींनी लिहिले.अरूण गोविल यांना हे समजल्यावर त्यांनी मोदींचे आभार मानलेत. पण सोबत माझे अधिकृत ट्विटर अकाऊंट @ArunGovil12 या नावाने आहे, याचाही खुलासा केला. तेव्हा कुठे  फेक युजरने गोविल यांचे फेक अकाऊंट डिलीट केले.

दिली माहिती

फेक अकाऊंटचा असा पर्दाफाश झाल्यानंतर अरूण गोविल यांनी एक व्हिडीओ जारी करून, स्वत:च्या अधिकृत अकाऊंटबद्दल माहिती दिली. माझ्या नावाने बनावट सोशल अकाऊंट बनवले जात आहेत. कृपया असे करू नका, अशी विनंती त्यांनी या माध्यमातून केली.

टॅग्स :रामायणनरेंद्र मोदी