Join us  

लॉकडाऊनमुळे पुन्हा सुरू होणार आहे रामायण, वाचा किती वाजता आणि कुठे पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:44 AM

रामायण या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. लोकांच्या मागणीचा विचार करता ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

ठळक मुद्देप्रकाश जावडेकर यांनी ट्वीट केले असून त्यात लिहिले आहे की, उद्या म्हणजेच शनिवारी 28 मार्च पासून रामायण दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर पुन्हा सुरू होणार आहे. पहिला भाग सकाळी नऊ तर दुसरा रात्री नऊ वाजता प्रक्षेपित केला जाईल.

रामायण या मालिकेला ऐंशी-नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण या कार्यक्रमांची आठवण आली होती.

रामायण या मालिकेचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होत होती. आता रामायण या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. लोकांच्या मागणीचा विचार करता ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत लोकांना ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी नुकतेच ट्वीट केले असून त्यात लिहिले आहे की, लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली असल्याने उद्या म्हणजेच शनिवारी 28 मार्च पासून रामायण दूरदर्शन नॅशनल वाहिनीवर पुन्हा सुरू होणार आहे. पहिला भाग सकाळी नऊ तर दुसरा रात्री नऊ वाजता प्रक्षेपित केला जाईल.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात काहीच दिवसांपूर्वी रामायण या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. रामायण या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाल्यावर या भूमिकेपासून दूर जाणे आणि काही नवीन करणे कठीण होते का असे विचारले असता रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी या कार्यक्रमात सांगितले होते की, “रामायणात काम केल्यानंतर मला चित्रपटात योग्य अशा भूमिका मिळत नव्हत्या. त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण काही दिवसांनी मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना भेटलो. ते जंजीर, लावारिस, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी मला एखादी मोठी भूमिका न देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले होते की, मी तुला एखादी मोठी भूमिका देऊ शकत नाही...कारण तू अजूनही तुझ्या श्रीरामाच्या व्यक्तिरेखेसाठीच ओळखला जात आहेस आणि ती प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही. त्यानंतर मी माझी प्रतिमा पुसण्याचे अनेक प्रयत्न केले. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. पण तरीही तब्बल तीन दशकांनंतर देखील माझी श्रीरामाची प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही.

टॅग्स :रामायणकोरोना वायरस बातम्या