Join us  

लेडीज स्पेशलमध्ये दिसणार रणवीरच्या 'दिल धडकने दो'मधला हा सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 5:29 PM

प्रार्थना ही व्यक्तिरेखा साकारणारी छवि पांडे एक कणखर, स्वतंत्र स्त्री आहे, जी एक यशस्वी स्त्री तर आहेच पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याची खटपट देखील ती सतत करत असते.

ठळक मुद्देप्रार्थना ही एक खंबीर आणि यशस्वी स्त्री आहे

लेडीज स्पेशल या अत्यंत वास्तवदर्शी मालिकेत बिंदू, मेघना आणि प्रार्थना या तीन अत्यंत कणखर महिलांचे जीवन चित्रण आहे, ज्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. सशक्त आणि स्वतंत्र स्त्री दाखवणे हा या मालिकेचा उद्देश आहे आणि या मालिकेतील स्त्री व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ते उत्तम साध्य झाले आहे.  प्रार्थना ही व्यक्तिरेखा साकारणारी छवि पांडे एक कणखर, स्वतंत्र स्त्री आहे, जी एक यशस्वी स्त्री तर आहेच पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याची खटपट देखील ती सतत करत असते. दुसरीकडे, आदित्य आहे, जो तिचा भाऊ दाखवला आहे, तो एक आळशी मुलगा आहे. तो नेहमी कुटुंबासमोर काही तरी समस्या उभी करत असतो. पण तरीही कुटुंबातील सर्वांचा लाडका असतो. ही बहीण-भावाची जोडी ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील प्रियंका आणि रणवीर यांच्या जोडीसारखीच आहे. रणवीर आणि प्रियंका प्रमाणेच पुनीत आणि प्रार्थना यांच्यात एक छान भावबंध आहे आणि ते दोघे कडू गोड प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. प्रार्थना ही एक खंबीर आणि यशस्वी स्त्री आहे, जी पुनीतला त्याने उभ्या केलेल्या अडचणींमधून बाहेर काढत असते. फक्त पडद्यावरच नाही, तर पडद्याच्या मागे, सेटवर देखील ते दोघे भावंडांसारखेच असतात आणि एकमेकांना मदत करतात. छवि म्हणते, “पुनीत मला लहान भावासारखा आहे आणि शक्य असेल ती सर्व मदत त्याला करणे हे माझे कर्तव्य आहे. भावंडांचे महत्त्व माझ्याइतके कोणाला माहीत असणार! कारण मी संयुक्त कुटुंबात राहिले आहे आणि माझे संपूर्ण लहानपण एकाच घरात अनेक चुलत भावंडांसोबत गेले आहे. आमच्यात जो जिव्हाळा होता, आणि आम्ही लहान लहान गोष्टीत एकमेकांना मदत करायचो, ते मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही खोड्या काढण्यातही एकत्र असायचो.” आदित्य म्हणतो, “छवि आणि मी बहीण-भावासारखे आहोत, जे एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दटावतात, एकमेकांवर रागावतात पण तरीही शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहतात. माझ्यासाठी पडद्यावरील हे बहीण-भावाचे नाते विशेष महत्त्वाचे आहे कारण ते मला मी आणि माझ्या सख्ख्या बहिणीची याद देते.”

टॅग्स :लेडीज स्पेशलरणवीर सिंग