Join us

​तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा हा भाग झाला लीक, मालिकेची टीम आली टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 13:34 IST

तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या ...

तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजली यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत हार्दिक जोशी राणाची तर अक्षया देवधर अंजलीची भूमिका साकारत आहे. या एका मालिकेने हर्षद आणि अक्षया यांना प्रचंड फेमस बनवले आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या कोल्हापूर येथे सुरू असून या मालिकेचे चित्रीकरण पाहायला लोक प्रचंड गर्दी करत आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणामुळे कोल्हापूरमधील गावात लोकांची प्रचंड ये जा होत असल्याने तेथील स्थानिक लोकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे आणि त्यामुळे त्यांनी या मालिकेच्या चित्रीकरणाला विरोध देखील केला होता. पण आता या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. चित्रीकरण करण्यासाठी गावकऱ्यांनी काही अटी टीमवर लादल्या असून त्या टीमने पूर्ण देखील केल्या आहेत. चित्रीकरणाला गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मालिकेच्या टीमला चांगलेच टेन्शन आले होते. पण आता त्यांचे टेन्शन थोडे कमी झाले आहे. मात्र आता एका वेगळ्याच गोष्टीला या मालिकेच्या टीमला तोंड द्यावे लागत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला अनेक लोक आवर्जून उपस्थिती लावतात. पण चित्रीकरण पाहायला आलेल्या लोकांमुळे मालिकेच्या टीमला डोकेदुखी झाली आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा एक विशेष भाग २६ नोव्हेंबरला दाखवण्यात येणार आहे. या भागात हार्दिक जोशी म्हणजेच राणा वज्रकेसरीची कुस्ती लढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. या भागाच्या चित्रीकरणासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पण या गर्दीतील काही लोकांनी काही दृश्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि आता ही दृश्य व्हॉटसअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमांवर व्हायरल झाली आहेत. मालिकेची दृश्य प्रेक्षकांना टेलिकास्टच्या आधीच सोशल मीडियावर पाहायला मिळत असल्याने मालिकेच्या टीमला आता चांगलेच टेन्शन आले आहे. Also Read : अक्षया देवधर सांगतेय माझ्या यशात आहे या व्यक्तीचा वाटा