पल्लवी जोशी अनेक वर्षांनंतर झळकणार मराठी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:39 IST
पल्लवी जोशीने आरोहण, अल्पविराम, जुस्तजू यांसारख्या मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिकांमध्ये ...
पल्लवी जोशी अनेक वर्षांनंतर झळकणार मराठी मालिकेत
पल्लवी जोशीने आरोहण, अल्पविराम, जुस्तजू यांसारख्या मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिकांमध्ये आपल्याला तिला पाहायला मिळाले आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पल्लवी छोट्या पडद्यापासून दूर होती. पण तिने मेरी आवाज ही पहचान है या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक केला. तिच्या कमबॅकविषयी सीएनएक्सशी बोलताना तिने सांगितले होते की, मेरी आवाज ही पहचान है ही मालिका केवळ काहीच भागांची असल्याने मी या मालिकेचा भाग व्हायचे ठरवले. आजच्या मालिका, चित्रीकरणाची पद्धत सगळे काही बदललेले आहे. १५-२० वर्षांपूर्वी अनेक निर्माते मालिकांचे चित्रीकरण करण्याआधी वर्कशॉप घेत असत. तसेच अनेक बारीक बारीक गोष्टीही प्रत्येक कलाकाराला समजावून सांगितल्या जात असत. पण आता कोणालाच या गोष्टींसाठी वेळ नाहीये. त्यावेळी मालिकाही खूप कमी भागांच्या असायच्या. त्यामुळे मालिकेची संपूर्ण कथा, व्यक्तिरेखा शेवटपर्यंत मालिकेत कशाप्रकारे दाखवली जाणार याची आम्हा कलाकारांना कल्पना असायची. आज खूप गोष्टी बदलल्या आहेत. पण तरीही माझा काम करण्याचा अनुभव वाईट होता असे कधीच मी म्हणणार नाही. मी मालिकेत काम करत नसले तरी दरम्यानच्या काळात मी मराठी मालिकांची निर्मिती केली. तसेच सारेगमपा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सारेगमपा हा कार्यक्रम प्रेक्षकांना झी मराठीला पाहायला मिळाला होता. आता याच वाहिनीवर ग्रहण ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ग्रहण या मालिकेत आता पल्लवी मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळात पल्लवी हिंदी मालिकेत झळकली असली तरी मराठी मालिकेत तिला कित्येक दिवसांत प्रेक्षकांना पाहायला मिळाले नव्हते. या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरू झाले असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असले तरी या मालिकेत पल्लवीची भूमिका काय असणार, या मालिकेची कथा काय असणार याबाबत मालिकेच्या निर्मात्यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. Also Read : पल्लवी जोशी म्हणतेय, ‘पुनर्जन्म, बालविवाहऐवजी इतिहासाची शौर्यगाथा दाखवा'