Join us  

बाबो ! राधे माँ घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री, यासाठी देण्यात आली तगडी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:16 PM

राधे माँची भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री डॉली बिंद्रानेही राधे माँ पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिच्या विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त असलेला शो 'बिग बॉस 14' चा प्रोमो समोर येताच यंदाच्या पर्वात घरात बंदिस्त होणा-या अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. वादग्रस्त स्वयंघोषित राधे माँ देखील यंदाच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राधे माँ स्वत:ला देवीचा अवतार मानते तिच्या दरबारात तिच्या दर्शनासाठी सेलिब्रेटीही रांगा लावायचे. राधे माँचे खरे नाव सुखविंदर असे आहे. 

राधे माँच्या नावाने तिने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असायची. जगासमोर स्वतःला देवीप्रमाणे मिरवणारी राधे माँ तिच्या ख-या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस पद्धतीने राहायची. शॉर्ट स्कर्ट, जीन्स मधले फोटो तिचे सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर तीव्र टीकाही झाली होती.  

सेलिब्रेटी स्टेट प्राप्त झालेल्या राधे माँची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी बिग बॉसच्या टीमचा प्रयत्न आहे.गेल्या अनेक सीझनपासून  तिच्याशी संपर्क साधला जात होता, पण दरवेळी तिने नकार दिला. यावर्षी मात्र राधे माँने बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी होकार दिला आणि तेव्हापासून आता रसिकांचीही उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की. जगासमोर देवीचा अवताराता फिरणारी राधे माँचे या शोच्या निमित्ताने खरे रूप समोर येणार हे मात्र नक्की. घरात राधे माँला पाहणे नक्कीच रंजक असणार आहे. 

राधे माँची भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री डॉली बिंद्रानेही राधे माँ पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिच्या विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती.  'राधे माँ आणि तिच्या माणसांपासून माझ्या जीवाला धोका असून त्यांच्याकडून धमकीचे फोन व मेसेजेस येतात' असे डॉलीने तिच्या तक्रारीत म्हटले होते.राधे माँ व्यतिरिक्त यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री जस्मीन भसीन, निया शर्मा आणि नैना सिंह दिसणार आहेत. याशिवाय अनु मलिक आणि आमिर अली यांची नावेदेखील या समोर आली आहेत. 

टॅग्स :बिग बॉस