Join us

'सूर नवा ध्यास नवा'मध्ये लोकसंगीताचा नजराणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 13:17 IST

महाराष्ट्राला लोकसंगीताची मोठी परंपरा आहे. भक्तीरंगाने भरलेलं कीर्तन भजन असो की वीररसाने भारलेला पोवाडा असो.. तमाशा, बतावणीमधील मनोरंजन असो ...

महाराष्ट्राला लोकसंगीताची मोठी परंपरा आहे. भक्तीरंगाने भरलेलं कीर्तन भजन असो की वीररसाने भारलेला पोवाडा असो.. तमाशा, बतावणीमधील मनोरंजन असो की मनोरंजनातून उपदेश देणारे भारुड.. लोककलेचे विविध रंग इथे बघायला मिळतात.. आणि यातीलच काही प्रकार सादर होणार आहेत कलर्स मराठीच्या नव्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात.'महाराष्ट्र देशा' अशी संकल्पना असलेल्या या खास भागासाठी सुप्रसिद्ध गायक आणि लोकसंगीताचे बादशाह आनंद शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. एकाहून एक रंगतदार लोकगीतांनी सजलेले हे भाग येत्या सोमवारी प्रसारित होणार आहे.प्रसेनजीतचा शाहिरी बाणाकोल्हापूरचा रांगडा गडी प्रसेनजीत कोसंबी याने सादर केलेला प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या भेटीवरचा पोवाडा या आठवड्याचं विशेष आकर्षण असेल. प्रसेनजीतने आपल्या खड्या आणि पहाडी आवाजात हा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचा हा बाज पाहून अवधूत गुप्ते यांनी त्याला 'मानाचा मुजरा' केलाच शिवाय आजपासून मी तुला 'शाहिर' अशीच हाक मारणार असं म्हणत 'शाहिर' ही पदवीही दिली.आनंद शिंदे यांनीही प्रसेनजीतचं कौतुक करत तू ही शाहिरी कला जप आणि तिला कशी वाढवता येईल यासाठी मनोभावे प्रयत्न कर असा मोलाचा सल्लाही दिला.याशिवाय या भागात जयदीप बागवडकरने सादर केलेल्या 'नवीन पोपट' या आनंद शिंदे यांच्याच गाण्यावर सर्वांना ठेका धरायला लावला तर अनिरुद्ध जोशीने 'खंडेरायाच्या लग्नाला' गाऊन एकच धमाल उडवून दिली. श्रीरंग भावेच्या 'पार्वतीच्या बाळा' आणि जुईली जोगळेकरच्या 'चांदणं चांदणं झाली रात' या गाण्यांनी कार्यक्रमात वेगळे रंग भरले. आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. एकंदरीतच, लोकसंगीताला दिलेली ही त्याच बाजाची सांगीतिक मानवंदना प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकून घेईल अशीच झाली आहे.याशिवाय या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.