Join us  

महाभारतातील द्रोपदीची भूमिका या अभिनेत्रीला करण्यात आली होती ऑफर, चित्रपटासाठी दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:20 AM

द्रोपदीच्या भूमिकेसाठी रूपा गांगुली नव्हे तर आजची बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री निर्मात्यांची पहिली चॉईस होती.

ठळक मुद्देमहाभारत या मालिकेत जुही चावला द्रोपदीची भूमिका साकारणार हे पक्कं झालं होते. पण त्याचवेळी तिला कयामत से कयामत तक या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिने तिचा निर्णय बदलला.

बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही मालिका सुरू असताना त्या काळात लोक घराच्या बाहेर देखील पडायचे नाहीत. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना दूरदर्शनवर महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेत द्रोपदीच्या भूमिकेत आपल्याला रूपा गांगुलीला पाहायला मिळाले होते. 

पण तुम्हाला माहीत आहे का, या भूमिकेसाठी रूपा गांगुली नव्हे तर आजची बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री निर्मात्यांची पहिली चॉईस होती. तिने या मालिकेसाठी नकार दिल्याने रूपा गांगुलीची या मालिकेत वर्णी लागली.

महाभारत या मालिकेत जुही चावला द्रोपदीची भूमिका साकारणार हे पक्कं झालं होते. पण त्याचवेळी तिला कयामत से कयामत तक या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिने तिचा निर्णय बदलला. कयामत से कयामत तक या चित्रपटाची ऑफर आल्यानंतर जुहीने महाभारतच्या निर्मात्यांना ती मालिकेत काम करू शकत नसल्याचे कळवले. त्यामुळे दुसऱ्या नायिकेची द्रोपदीच्या भूमिकेसाठी शोधाशोध सुरू झाली आणि रूपा गांगुलीला ही भूमिका मिळाली.

जुही चावलाने एका मुलाखतीत सांगितले होते की, महाभारत ही मालिका न करता तिने नासिर हुसैन यांच्या चित्रपटात काम करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे काही जणांनी तिला सांगितले होते. कारण त्यावेळी नासिर हुसैन यांचे लागोपाठ तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. पण तरीही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि महाभारत मालिकेत काम न करता चित्रपटात काम करण्याचे ठरवले.

जुही चावलाने 'कयामत से कयामत तक', 'हम है राही प्यार कै', 'डर' आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. तिला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत.

टॅग्स :महाभारतजुही चावला