Join us  

‘कम्फर्ट झोनबाहेरच्या भूमिका करायला आवडतात!’-अभिनेता संग्राम साळवी

By अबोली कुलकर्णी | Published: September 09, 2018 3:02 PM

टीव्ही इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या निगेटिव्ह शेड्ससह भूमिका साकारून अभिनेता संग्राम साळवी याने नाव कमावले. त्याच त्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या संग्रामला आता एक नवी कोरी भूमिका करायला मिळणार आहे.

टीव्ही इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या निगेटिव्ह शेड्ससह भूमिका साकारून अभिनेता संग्राम साळवी याने नाव कमावले. त्याच त्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या संग्रामला आता एक नवी कोरी भूमिका करायला मिळणार आहे. झी युवा वाहिनीवर ‘सूर राहू दे’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याला अत्यंत वेगळी भूमिका साकारायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...

 * ‘सुर राहू दे’ या आगामी मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील?- माझ्या व्यक्तीरेखेचं नाव तन्मय असं आहे. आत्तापर्यंत के लेल्या सगळया व्यक्तिरेखांपेक्षा अगदी वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. यामुळे माझी पूर्णपणे इमेज बदलली आहे. प्रोमो लाँच झाल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनाही विश्वास बसत नव्हता की तो मी आहे म्हणून. पण, खरंच चांगलं वाटतंय की, माझ्यावर वाहिनीने विश्वास ठेवला आणि काहीतरी वेगळे माझ्याकडून करून घेत आहेत. 

 * या मालिकेची आॅफर तुला मिळाली तेव्हा तुझी रिअ‍ॅक्शन काय होती?- खरंतर मला खूप आनंद झाला. कारण, मी काहीतरी वेगळे करणार होतो. मला याअगोदर जेव्हा मंदार सरांकडून या मालिकेविषयी कळालं मी कथानक समजून घेतलं. तेव्हा मला कथा खूप आवडली. मला काहीतरी वेगळे करायला मिळणार या एकाच विचाराने मी आनंदित झालो होतो.

 * तू आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काहीशा निगेटिव्हच भूमिका साकारल्या आहेत. यापुढेही तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतील?- होय, मी यापूर्वी बहुतेक निगेटिव्हच भूमिका साकारल्या आहेत. मी ज्यात स्वत:ला अनकम्फर्टेबल असेल तीच भूमिका करायला मला आवडेल. मला आव्हानात्मक भूमिका करायला जास्त आवडतात. मला स्वत:ला चॅलेंज द्यायला खूप आवडतं. कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला मला खूप आवडतं.

 * ‘रिंग रिंग रिंगा’ या नाटकांत आणि ‘पन्हाळा’ या चित्रपटातही काम केलं आहेस आणि आता बऱ्याच मालिकाही केल्यास. तर नाटक, चित्रपट आणि मालिका यांपैकी कोणत्या प्रकारात तू जास्त कम्फर्टेबल असतोस?- होय. खरंतर तिन्ही माध्यमं ही वेगळी आहेत. पण, मला नाटक हे माध्यम खूप जास्त आव्हानात्मक वाटतं. कारण, नाटक करत असताना आपल्याला काहीच संधी नसते. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात फार कमी अंतर असते. रिटेक्स करता येत नाहीत. पण, तरीही त्यात आव्हान असल्याने मला आवडते. 

* डेली सोप म्हटल्यानंतर दररोज बराच वेळ द्यावा लागतो. मग स्वत:साठी वेळ कसा काढतोस?- खरंतर वेळ मिळत नाही. वेळ काढावा लागतो. जसा वेळ मिळेल तसा वेळ काढतो. कारण काम करायला मला आवडतं. त्यामुळे असा ब्रेक मिळावा असं काही वाटत नाही. पण, होय तेवढंच आपल्या आवडीचं काम करत असल्यामुळे समाधान नक्कीच मिळतं. 

 * तुझा ड्रीम रोल काय आहे?- मला आव्हान वाटेल असं एखादं काम करायला आवडेल. माझ्यासाठी माझी भूमिका आणि त्यात किती आव्हान आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ड्रीम रोल असा काही नाहीये.

टॅग्स :टेलिव्हिजनझी युवा