Join us  

घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण?; नवीन मालिका 'सावली होईन सुखाची' लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 3:46 PM

सन मराठीवर लवकरच ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका येत्या १४ ऑगस्टपासून भेटीला येत आहे.

सन मराठीवर लवकरच ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे. प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका घेऊन येत आहे, ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.

रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत. 'सावली होईन सुखाची' १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.