Join us  

...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:59 AM

हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोमन इराणींबरोबर घडलेला किस्सा सांगितला. नम्रताला बघून बोमन इराणींनी त्यांची कार थांबवल्याचं तिने सांगितलं. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली. अनेक कॉमेडी शो, मालिका आणि सिनेमांत काम केलेल्या नम्रताचा चाहता वर्ग मोठा आहे. हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोमन इराणींबरोबर घडलेला किस्सा सांगितला. नम्रताला बघून बोमन इराणींनी त्यांची कार थांबवल्याचं तिने सांगितलं. 

"व्हेंटिलेटर सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बोमन इराणींनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. तुझी ही भाषा कुठेतरी वापरणार असं ते मला म्हणाले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की सर मी तुमची खूप मोठी चाहती आहे. त्यावर ते मला म्हणाले होते की नाही मी तुझा मोठा चाहता आहे. त्यानंतर आमचं पॅकअप झाल्यानंतर मी घरी जाण्यासाठी रिक्षा बघत होते. तेवढ्यात बोमन इराणी तिथे आले. त्यांनी मला विचारलं की तू कुठे जातेस. मी त्यांना सांगितलं की काळाचौकीला जात आहे. मग रिक्षाने का चालली आहेस? असा प्रश्न त्यांनी मला विचारलं. त्यावर मी त्यांना हो रिक्षानेच जाणार, असं सांगितलं. त्यांची BMW कार होती. त्यांनी ड्रायव्हरला सांगून माझं सामान गाडीत ठेवायला सांगितलं. मला गाडीत पाठीमागे बसवायला सांगितलं. त्यांना मध्ये दादरला उतरायचं होतं. त्यामुळे घरी जाईपर्यंत ते मला इतके वेळा सॉरी म्हणाले. सॉरी नम्रता, मी दादरला उतरेन मग तू काळाचौकीला जा, असं ते म्हणाले. ही विनम्रता मी त्यांच्याकडून शिकले. त्यांच्या गाडीत बसल्यानंतर मी त्यांना म्हणाले होते की सर मी पहिल्यांदा BMW मध्ये बसले आहे. तर ते म्हणाले की मी पण कधीतरी पहिल्यांदा BMWमध्ये बसलो होतो. एक दिवस तू स्वत:च्या BMW मध्ये बसशील," असं नम्रता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "ते एक वाक्य म्हणाले होते की कधीच सेटवर आपल्याकडून नकारात्मकता पसरवली गेली नाही पाहिजे. आपण नेहमीच सकारात्मक राहिलं पाहिजे. व्हेंटिलेटर सिनेमावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये रिअल लोकेशनवर शूट करत होतो. त्यामुळे तिथे गरम होत होतं. त्या शॉटमध्ये त्यांचा फक्त खांदा दिसणार होता. ते डमी आर्टिस्टकडून करून घेऊ शकले असते. पण, तरी समोरच्या कलाकाराला ते फील झालं पाहिजे. म्हणून तो संपूर्ण सीन त्यांनी शूट केला." 

दरम्यान, नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून १ मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावटिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रा