Join us  

काही दमच नाही रे आरोपांमध्ये..., किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:07 AM

Kiran Mane New Post : ‘अपशब्द वापरत होता तर त्याला थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलिस कम्प्लेन्ट का नाही केली? हे सांगायला पन्नास तास का लावले?,’ अशा आशयाची किरण माने यांची पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.

अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’  (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आलं.  सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. पण स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने मात्र त्यांना हा आरोप खोडून काढत,  किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे मालिकेतून काढल्याचं स्पष्ट केलं आहे.

स्टार प्रवाह वाहिनीच्या आरोपांना किरण माने यांनी आता एका फेसबुक पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करत, त्यांनी एक उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. ‘किरण माने अपशब्द वापरत होता तर त्याला   थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलिस कम्प्लेन्ट का नाही केली? हे सांगायला पन्नास तास का लावले? छ्या! काही दमच नाही रे आरोपांमध्ये...,’ अशा आशयाची त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. वाचा किरण मानेंची पोस्ट...

स्टार प्रवाह वाहिनीचे स्पष्टीकरणकिरण माने प्रकरणाबाबत स्टार प्रवाह वाहिनीनं मौन सोडलं आहे. राजकीय भूमिका घेतल्याने नव्हे, तर मानेंकडून इतर कलाकारांसोबत गैरवर्तणूक सुरू असल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं  स्पष्टीकरण वाहिनीने दिलं आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे किरण माने यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.  माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषत: महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला. सहकलाकार, दिग्दर्शक यांचा ते अनादर करायचे. याबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली. पण, त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषत: महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

याबाबत दिग्दर्शक सचिन देव म्हणाले, की अभिनेते किरण माने यांची सेटवरील वागणूक बरोबर नव्हती. त्यांना प्रॉडक्शन हाऊसकडून तीन वेळा समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी आपली वागणूक सुधारली नाही. त्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा राजकीय मत समाजमाध्यमांवर मांडले म्हणून काढण्यात आलेलं नाही.  

टॅग्स :किरण मानेस्टार प्रवाह