Join us

मुक्ता बर्वे, किरण करमरकर आणि वंदना गुप्ते झळकणार रुद्रममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 10:43 IST

रुद्रम ही मालिका ठरावीक भागांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ...

रुद्रम ही मालिका ठरावीक भागांची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता ती रुद्रम या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर तिच्यासोबत वंदना गुप्ते आणि किरण करमरकर यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.कहानी घर घर की या मालिकेतील ओम या भूमिकेमुळे किरण करमरकर सगळ्यांनाच चांगले माहिती आहेत. त्यांनी पूर्वी दामिनी या मराठी मालिकेतदेखील काम केले होते. अनेक वर्षांनंतर ते एका मराठी मालिकेत दिसणार आहेत. मुक्ता, किरण आणि वंदना गुप्ते हे तिघेही अतिशय मातब्बर कलाकार रुद्रम या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याचसोबत सतीश राजवाडे, मोहन आगाशे, संदीप पाठक, मिताली जगताप, सुहास पळशीकर, विवेक लागू, सुहास सिरसाट, सई रानडे, अनिरुद्ध जोशी, मिलिंद फाटक, सुनील अभ्यंकर, आनंद अलकुंटे, किरण खोजे, आशिष कुलकर्णी यांच्या देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. रुद्रम या मालिकेची निर्मिती निखिल सेठ, विनोद लव्हेकर, संदेश कुलकर्णी यांच्या पोतडी एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केली आहे. गिरीश जोशी यांनी या मालिकेची कथा लिहिली असून भीमराव मुडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या आणि स्वतःचे कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती' च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच रुद्रम ही मालिका आहे.  Also Read : Exclusive : मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस यांची जोडी पुन्हा जमणार