Join us  

'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मालिकेत होणार मोठा बदल; उलगडणार दैवी सामर्थ्याचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 5:45 PM

Balumamachya navan changbhal: "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" या मालिकेच्या माध्यमातून बाळू मामांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मात्र, आता लवकरच या मालिकेत बदल होणार आहे.

ठळक मुद्देबाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें” ! अशी संताची खरी ओळख. महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा (Balumamachya navan changbhal). संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. गेल्या दोन वर्षांपासून "बाळूमामाच्या नावानं चांगभलं" या मालिकेच्या माध्यमातून बाळू मामांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मात्र, आता लवकरच या मालिकेत बदल होणार आहे.

या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातील रुप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना आपलंसं केलं. इतकंच नाही तर मोठ्या रुपात सादर झालेल्या बाळूमामांनी समाजाला प्रपंच, प्रेम, गोरगरीबांची सेवा करणं अशा अनेक गोष्टींची शिकवण दिली. त्यानंतर आता या मालिकेत दसऱ्याच्या शुभमुर्हूतावर नवा बदल पाहायला मिळणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बाळू मामांच्या दैवी सामर्थ्याचा नवा अध्याय सुरु होणार आहे. 

बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता.तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झाले असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात,अंधश्रद्धा,भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. हे सारं काही नव्या अध्यायामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंटेलिव्हिजनसेलिब्रिटी