Ruchira Jadhav :'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या रुचिरा स्टार प्रवाह वाहनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत लावण्या हे खलनायिकी पात्र साकारत आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. अशातच आता दिलेल्या एका मुलाखतीत तिने केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांचं लक्ष स्वत: कडे वेधलं आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने कन्यादानाच्या प्रथेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
नुकतीच रुचिराने 'सुमन म्युझिक पॉडकास्ट'मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान लग्नाबद्दल तुझं मत काय? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर बोलताना रुचिरा म्हणाली, "मला त्या लोकांचा आदर आहे जे लग्नसंस्थेवर विश्वास ठेवतात. पण, माझी स्वत: ची सुद्धा काही मतं आहेत, ज्यांचा मी आदर करते. मला काही गोष्टी नाही पटत. कन्यादानाची भावना वगैरै छान आहे पण मला तो शब्द नाही आवडत. कन्येचं दान नाही होऊ शकत. कन्येचा फार फार तर मान होऊ शकतो. देवानेच मला निर्माण केलं आणि माझ्या आई-वडिलांनी जन्म दिला. तसं मला एका वस्तूचं दान होतं तशी वागणूक दिली जाऊ नये. तुम्ही प्रथा करा, पण त्याला कन्यादान म्हणू नका."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "लग्नसंस्था ही फार एकतर्फी आहे, हे माझं प्रांजळ मत आहे. आपण कितीही स्त्री- पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या तरी देखील मुलीला तिची ओळख बदलणं ही गोष्ट कुठून आली आहे. एक दुसरा जीव तिच्या शरीरातच वाढतो. त्याला ती जन्माला घालते. ती वेदना तिला होते. तर मग तिचं नाव का नाहीए त्या जीवाला? हा प्रश्न मला अनेकदा पडतो. बरं ज्यांना त्याग करायचं आहे त्यांनी करा. मला त्यांच्याबद्दल निरादार नाही. मी या स्पष्ट मताची आहे. माझं नाव जर रुचिरा जाधव आहे तर भविष्यात माझी होणारी मुलगी किंवा मुलगा जे काही असेल तो जाधव का नाही? माझं असंही म्हणणं नाही की माझ्या पार्टनरचं नाव लावू नये, त्यांचंही नाव असलंच पाहिजे आणि माझंही नाव असलं पाहिजे." असं अभिनेत्री या मुलाखतीत म्हटलं.