Join us

"परभणीच्या काद्राबाद' एरियात रहायचो", कतारमध्ये संकर्षणच्या मराठी नाटकाला उदंड प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 15:15 IST

संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचा कतारमध्ये हाऊसफुल्ल प्रयोग झाला. 

मराठी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षण सध्या नाटक , टीव्ही आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांत मुशाफिरी करत आहे.  संकर्षण विविध माध्यमांत कार्यरत असला तरीही त्याने रंगभूमीची कास सोडली नाही. त्याचे नाटकचे प्रयोग सुरू असतात. नुकतं संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचा कतारमध्ये हाऊसफुल्ल प्रयोग झाला. 

परदेशात नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून संकर्षण कऱ्हाडे भारावल्याचं पाहायला मिळालं. यावर त्याने एक खास पोस्ट केली आहे. त्याने लिहलं, "नमस्कार अहो 'परभणीच्या काद्राबाद' एरियात रहायचो तेव्हा कधीही वाटलं नव्हतं कि "कतार" मध्ये HOUSEFUL प्रयोग करायची संधी मिळेल !!! जवळपास ८०० लोकांनी भरलेलं ते सभागृह , प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि पाणीपुरीच्या खमंग प्लेटनंतर सूकी पूरी मागावी तशी नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी केलेली कवितेची फर्माईश … माशा अल्लाह ! काय मज्जा आली !!!"

पुढे तो म्हणतो, "मराठी माणसांना, रसिक प्रेक्षकांना जगात तोड नाही… कतार मराठी मंजळाने केलेलं आऊटसॅडिंग, उत्तम नियोजन... येताना एअर ईंडियाच्या विमानांत बसलो तर Cabin Crew इनचार्ज अनघा मॅडम होत्या… त्यांनी ओळखलं, विशेष काळजी घेतली, गिफ्टं दिलं. असा सगळा दौरा सुफल संपन्नं झाला.आता हे सगळं वाचून तुम्ही पोस्टवर कमेंट करून पुढच्या प्रयोगाला आलात कि अजून दुसरं काय पाहिजे ???", या शब्दात संकर्षणने आनंद व्यक्त केला.

संकर्षण कऱ्हाडेने २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आभास हा या मालिकेतून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. संकर्षणने मला सासू हवी, 'खुलता कळी खुलेना' आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्रात त्याच्या 'संकर्षण व्हाया स्पृहा', 'तू म्हणशील तसं’' आणि 'नियम व अटी लागू' या नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेताकतारसेलिब्रिटी