Join us

Exclusive: "नकारात्मक भूमिका साकारणं हे माझ्यासाठी आव्हान...", 'नशीबवान'मधील व्यक्तिरेखेबद्दल सोनाली खरे काय म्हणाली?

By सुजित शिर्के | Updated: September 30, 2025 16:46 IST

१० वर्षांनी टीव्हीवर परतली, कमबॅकलाच मिळाली 'खलनायिका'; अभिनेत्री सोनाली खरे म्हणते...

मराठी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी काही अभिनेते,अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्यापैकीच आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने मराठी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जवळपास १० वर्षांनंतर या नायिकेने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. यानिमित्ताने तिने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला.

>>> सुजित शिर्के 

साधारण १० वर्षांनी तुम्ही 'नशीबवान'या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहात. काय भावना आहेत ?

टेलिव्हिजन कायम खूप जवळचं माध्यम राहिलं आहे. माझ्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमुळे झाली, मला खरी ओळख या माध्यमाने मिळवून दिली. त्यामुळे टीव्हीवर यायचं होतं. पण, छान काहीतरी येण्याची वाट बघत होते तो योग या मालिकेच्या माध्यमातून जुळून आला. महेश कोठोरे यांचं प्रोडक्शन हाऊस आणि  स्टार प्रवाहसारखं नंबर वन चॅनेल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वेगळी निगेटिव्ह भूमिका जी मी यापूर्वी केली नव्हती. ते सगळं जुळून आलं आणि छान वाटलं. आता खूप उत्सुकता आहे की लोक कशा प्रकारे प्रतिसाद देतील.

 

'नशीबवान' मालिकेची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण काय? 

पहिली गोष्ट म्हणजे भूमिका खूप आव्हानात्मक वाटली. या प्रकारची भूमिका याआधी केली नव्हती. टीव्हीवर नकारात्मक भूमिका साकारणं हे खूप आव्हान देणारं असतं. त्यामुळे माझ्यासाठी ते एक आव्हान होतं. अशी भूमिका कधीही न केल्यामुळे ही माझी स्वत:साठीच एक परीक्षा होती. शिवाय जसं मी म्हटलं की प्रोडक्शन हाऊस, चॅनेल, सुंदर टीम ही सगळी मंडळी होती. त्यामुळे या सगळ्या दृष्टीने विचार करुन हा निर्णय घेतला.

सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे या निमित्ताने तुमच्या आयुष्यात आलेल्या नवदुर्गा कोण आहेत? ज्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं ठरलं?

माझ्यासाठी नवदुर्गा ही माझी आईच होती. तिने मला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. तिने ज्याप्रकारे मला चांगल्या-वाईट गोष्टी, कसं राहायचं, इतरांना कसा मान द्यायच्या. एक कलाकार म्हणून कसं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिने मला शिकवल्या. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात मोठी दुर्गा म्हणाल किंवा देवी म्हणाल तर तिचं आहे.

 

चित्रपट, मालिका  या माध्यमात तुम्ही काम केलं आहे, या प्रवासातील एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगा. 

मी खूप नशीबवान होते. मला उत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये चांगली टीम असायची. म्हणजे अशा कलाकृतींचा मी भाग होते ज्यांच्याबद्दल बोललं जातं.'आभाळमाया' आहे, 'अवंतिका' आहे अशा बऱ्याच मालिका आहेत. चित्रपट म्हणाल तर 'चेकमेट', 'सावरखेड एक गाव', अशा कलाकृतींचा मी भाग होते. विक्रम गोखले,सदाशिव अमरापूर अशी बरीच मोठी मंडळी होती ज्यांच्यासोबत मला काम करता आलं. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

 

गेली बरीच वर्ष तुम्ही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहात, तर तेव्हा आणि आताच्या इंडस्ट्रीमध्ये काय बदल जाणवतो?

आता मराठी इंडस्ट्री खूप प्रोफेशनल आणि टेक्निकलरित्या अॅडव्हान्स व्हायला लागली आहे. आपल्या मराठीमध्ये कथानक आणि कन्टेन्ट हे कायमच सुंदर असायचं. पण,  कुठेतरी बजेट आणि टेक्निकलदृष्ट्या आपण मागे पडत होतो. पण, आता मोठे-मोठे लोक मराठी इंडस्ट्रीत गुंतवणूक करायला लागले आहेत. त्यामुळे क्रिएटिव्ह माणसांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव दिला जातोय. याचा चांगला फायदा इंडस्ट्रीला होतोय.

 

कलाक्षेत्रात 'असणं', 'दिसत राहणं' या गोष्टी महत्त्वाच्या असतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

हल्ली तुम्ही जितके लोकांना दिसाल तितकं जास्त तुम्हाला काम मिळत जातं, असं मला  वाटतं. आता स्पर्धा खूप वाढली आहे. वेगवेगळी माध्यमं आली आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नवे चेहरे दिसत आहेत. या स्पर्धेत आपलं स्थान टिकवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे किंवा कामाच्या माध्यमातून लोकांसमोर येणं जास्त गरजेचं आहे. नवीन गोष्टी येतायत आणि त्याच्यामुळे काही गोष्टींचं महत्त्व कमी होत चाललं आहे. लोकांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे याचं वाईट वाटतं. 

 

हल्ली सोशल मिडियावर कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

आपण अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देणं टाळलं पाहिजे. आपण जे करतोय, ती गोष्ट आपल्याला पटतीये आपल्याला आवडते आहे, त्याबद्दल बाकीचे लोक काय बोलतायेत त्याकडे लक्ष न देता स्वत:च्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करुन ज्या गोष्टी आवडत आहेत त्या करणं जास्त महत्त्वाचं आहे. लोक तर तुम्ही कितीही चांगली गोष्ट केलीत तर बोलणार  आहेत, त्यावर शंका घेणारच आहेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्यातल्या किती व्यक्ती खऱ्या आणि किती खोट्या असतात, हे कोणालाच माहित नसतं.त्यांच्या आयुष्यामध्ये ते किती यशस्वी झाले आहेत, हे पाहिलं तर असं आपल्याला कळेलं  की आपण जे केलंय ते त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं केलंय. त्यामुळे लोकांना जे करायचं त्यांना ते करत राहु दे.आपण आपल्या कामाशी आणि मतांशी प्रामाणिक राहावं. 

इंडस्ट्रीत काम करताना चांगले-वाईट अनुभव येत असतात, तुम्हाला असा कोणता अनुभव आलाय का?

आतापर्यंत मला इंडस्ट्रीमध्ये काम करताना कोणताही वाईट अनुभव आला नाही.काही गोष्टी मिळाल्या नाहीत किंवा माझ्या हाती येणार होत्या त्या कोणत्यातरी चांगल्या गोष्टीसाठीच नाही झाल्या. माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, घडतंय ते खूप सुंदर आहे. त्यामुळे असं नाही वाटत की अशी कोणती गोष्ट जी आपण का केली नाही, किंवा आपल्यासोबत का झाली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Negative role a challenge: Sonalee Kher speaks on 'Nasheebwaan' character

Web Summary : Sonalee Kher discusses her return to television after 10 years with 'Nasheebwaan'. She embraces the challenging negative role and shares insights on her career and industry changes.
टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटी