मनवा नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये सुद्धा तिने काम केलं आहे. मनवा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसून येतं. चाहत्यांना ती वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट देत असते. काही पर्सनल अनुभवही ती शेअर करत असते. मनवाने नुकतंच व्हिडीओ शेअर करत तिला आलेला टाटा कंपनीच्या कारचा वाईट अनुभव शेअर केला आहे.
मनवाने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टाटा कंपनीची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली नवी कोरी कार सतत बंद पडत असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय वारंवार तक्रार करुनही अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचं आणि टाटा कंपनीकडून योग्य सुविधा मिळत नसल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. या व्हिडीओत मनवा म्हणते, "माझा एक भयानक अनुभव मी तुम्हाला आता सांगणार आहे. माझ्याकडे टाटाची nexon Ev ही गाडी आहे. आणि आहे का होती म्हणावं मला कळत नाहीये. कारण गेल्या ६ महिन्यांमध्ये ती गाडी टाटाच्या वर्कशॉपला वारंवार जात आहे. कारण दर वेळेला ४-५ दिवसांनी ती बंद पडते. तिचा गिअर अडकतो. त्याची बॅटरी बिघडते...आणि नवीन गाडी आहे".
"मी टाटा मोटर्स, नेक्सन, ज्यांच्याकडून मी गाडी घेतलेली अशा सगळ्यांना इमेल पाठवून झाले आहेत. परंतु त्यांच्याकडून जो रिझल्ट अपेक्षित होता तो मिळाला नाही. त्याबद्दल मी नाराज आहे. सहा महिन्यात सहा वेळा गाडी बंद पडली. गिअर अडकतो... रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडते. एकदा तर D गेअरवरच बंद पडली. त्यामुळे मी फक्त सरळच जाऊ शकत होते. मला आता काळजी वाटत आहे", असंही मनवाने पुढे म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभवही शेअर केले आहेत.