Join us

'ही गोष्ट माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे'; प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 12:20 PM

Milind gawali: ही अभिनेत्री मिलिंद गवळी यांची खास मैत्रीण असून या दोघांनी एकत्र कामही केलं आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता मिलिंद गवळी यांनी तुफान लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या मिलिंद गवळी यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यामुळे त्यांना बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. अलिकडेच मिलिंद गवळी यांनी एका लोकप्रिय अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं आहे.

मिलिंद गवळी यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. आज सुप्रिया पाठारे यांचा वाढदिवस असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात मिलिंद गवळी यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत येत आहे.

"प्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....सुप्रिया वीस बावीस वर्षांपूर्वी आपण श्री वि.के. नाईक यांचा हा चित्रपट केला होता. “हे आपलं असंच चालायचं” आपण बहीण भावाची भूमिका केली होती. त्या चित्रपटाच्या इतक्या सुंदर आठवणी अजूनही माझ्या मनामध्ये घर करून बसले आहेत, आपल्या त्या सेटवर एक प्रेमळ अवलिया होता, जो प्रत्येकाला पोट दुखेपर्यंत हसवायचा, तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका विजू मामा ( विजय चव्हाण ), खूप म्हणजे खूपच मजा आली होती तो चित्रपट करताना , पण त्यानंतर आपल्याला एकत्र काम करायचा कधीच योग आला नाही, ही गोष्ट माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं नातं तितकच सुंदर आणि घट्ट आहे", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "तो तुझा पहिला चित्रपट होता, त्यानंतर तू अभिनय क्षेत्रात मागे वळून पाहिलंसच नाहीस, तुझे कष्ट, तुझी मेहनत तुझी चिकाटी and immense Talent, तुझं यश, तुझी प्रगती बघून मला खूप अभिमान वाटतो. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद, अशीच रहा, खूप खूप यशस्वी हो, आतापर्यंत तुझ्या अभिनयाने आम्हाला खूप हसवलंस , तसंच नेहमी हसवत राहा, आणि तू ही हसत रहा आणि आनंदी राहा.

दरम्यान, मिलिंद गवळी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे अॅक्टीव्ह आहेत.  ते कायम नवनवीन पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यापूर्वीही त्यांनी अनेक पोस्ट शेअर करत त्यांच्या करिअरमधील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. 

टॅग्स :मिलिंद गवळीसेलिब्रिटीटेलिव्हिजन