Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' शोला या अभिनेत्याने केला रामराम, कारण नुकतेच आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 10:36 IST

चला हवा येऊ द्या मधील हा कलाकार गेली २-३ आठवडे शोमध्ये पाहायला मिळाला नाही. त्यामुळे त्याने शो सोडला की काय असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे चित्रपट आणि नाटकांचे प्रयोग बंद पडले. त्यामुळे त्यांचे प्रमोशनदेखील झाले नाही. चला हवा येऊ द्या शोचा टीआरपीदेखील घसरला. आता पुन्हा नव्याने चित्रपटसृष्टी उभारी घेत आहे. चला हवा येऊ द्या या शोने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यातील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. याच शो एक अभिनेता गेल्या २ ते ३ आठवड्यांपासून पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे त्याने हा शो सोडला की काय असा सवाल अनेकजण विचारताना पाहायला मिळत होते.

चला हवा येऊ द्यामधील गुंठामंत्री म्हणून ओळख मिळवलेला पुण्यातील राजगुरूनगरचा कृष्णा घोंगे हा कलाकार गेली २-३ आठवडे शोमध्ये पाहायला मिळाला नाही त्यामुळे सोशल मीडियावर लोक त्याने शो सोडला की काय असे अनेक प्रश्न विचारत आहेत. नुकताच त्याने एक फोटो शेअर करत आपण काय करत आहोत याची कल्पना दिली आहे. प्रतीक गांधी सोबत ‘रिस्क है तो ईश्क है’ म्हणत त्याने एक फोटो शेअर केला आहे. कृष्णा घोंगे यांच्या बाबत एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कृष्णा आता झीच्या हिंदी मालिकेत झळकणार आहे. कृष्णा झी कॉमेडी शोचा एक भाग बनला आहे. प्रतीक गांधी झी कॉमेडी शोमध्ये आला होता तेव्हा त्याने त्याच्यासोबत हा फोटो काढला. कृष्णा आता हिंदी मालिकेत गेल्यामुळे तो चला हवा येऊ द्याच्या मंचावर पाहायला मिळणार नाही. अत्यंत सामान्य घरातील कृष्णा घोंगे कमी काळातच सर्वांच्या आवडीचा कलाकार बनला. कृष्णा घोंगे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावचा. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजुरी करायचे यासोबतच ते छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे अशी मिळेल ती छोटी मोठी कामे करत असे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असायची.

लहान असल्यापासूनच त्याला नाटकात काम करायची विशेष आवड होती. चौथ्या इयतेत असताना त्याने गवळ्याची रंभा ही स्त्रीव्यक्तिरेखा साकारली होती. पुढे सीएनसीमध्ये डिप्लोमाचे प्रशिक्षण घेतल्यावर चाकण येथील कंपनीत नोकरी केली. चाकण भागात मिंडा या कंपनीत त्याने काही वर्ष काम देखील केले आहे. पण त्यात काही खास मिळवता येत नसल्याने आपल्या बहिणीकडे मुंबईला जाऊन काहीतरी करायचे असे ठरवले. मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कार शिकवण्याचे काम केले. शोरूममध्ये सेल्समनची नोकरी केली. नोकरी करत असताना एक आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवले. पण आपल्या रांगड्या भाषेमुळे त्याला अनेक ठिकाणी नकार मिळाला. मग स्वतःच शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली त्यात त्याला अनेक पारितोषिके देखील मिळाली. पुढे निलेश साबळेशी ओळख झाली आणि निलेशच्या असिस्टंट म्हणून त्याला काम मिळाले. मग काही भागात त्याने अभिनय केला जो लोकांनी डोक्यावर घेतला आणि तो चला हवा येऊ द्या शोचा एक भाग बनला.

टॅग्स :चला हवा येऊ द्या