Join us

"जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर.."; अभिनेता अक्षय केळकरने लिहिलेल्या रोखठोक पोस्टची चर्चा

By देवेंद्र जाधव | Updated: July 5, 2025 11:59 IST

अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात त्याने मराठी - हिंदी भाषेच्या मुद्द्यावर रोखठोक मत दिलं आहे

अभिनेता अक्षय केळकर हा कायमच आसपासच्या सामाजिक-राजकीय घटनांवर भाष्य करताना दिसतो. अक्षयने नुकतंच एक पोस्ट लिहिलीये जी चर्चेत आहे. सध्या जो हिंदी-मराठी वाद सुरु आहे त्या प्रकरणाला उद्देशून अक्षय म्हणाला, "माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात असे माझे अनेक मित्र मैत्रिणी आणि परिचित लोक आहेत, जे जन्माने अमराठी आहेत. केवळ ४ ते ५ वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत परंतू ते खूप छान मराठी बोलतात.""त्याच सोबत अशीही काही माणसे आहेत, ज्यांना बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाहीये, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, तेव्हा तो आपल्या कृतीतून, प्रयत्नांतून स्पष्ट दिसत असतो. तुम्ही ज्या राज्यात वास्तव्याला आहात, त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येणं ही अपेक्षा खरंच इतकी मोठी आहे? तुम्हाला शुद्ध मराठीची कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये, तर फक्त गरजेपुरते मराठी बोलता येईल इतकीच अपेक्षा आहे."

"प्रत्येक राज्य जर तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारेच ठरविण्यात आला आहे, तर त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली जावी ही अपेक्षा चूक कशी काय असू शकते?तरीही, कोणत्याही कारणामुळे, जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर किमान सौजन्यपूर्वक ही बाब मान्य करून, मुजोरी न दाखवता ही संवाद साधता येऊ शकतो. इथे प्रत्येक जण – आपापल्या परीने कमवत आहे, कमवायलाच आलेला आहे. प्रत्येक जण कष्ट करून आपापल्या पद्धतीने जगतो आहे. तेव्हा, स्वतःच्याच जगण्यासाठी मिळवलेल्या उत्पन्नाचा आणि जमवलेल्या संपत्तीचा हा कोणता माज? जरी तुमचा जन्म इथे झाला नसला तरी, आपल्या कर्मभूमी बद्दल किमान आदर तरी असावा!"

टॅग्स :बिग बॉस मराठीहिंदीमराठीमराठी अभिनेता