Join us  

कौलारू घर, छोटंसं अंगण अन्...; मराठी अभिनेत्याने दाखवली कोकणातील घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 4:43 PM

माती-विटांचं बांधकाम, छोटंसं अंगण अन्...; मराठी अभिनेत्याचं गावातील घर पाहिलं का?

अभिजीत केळकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिजीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. सध्या अभिजीत त्याच्या कुटुंबीयांबरोबर रत्नागिरीतील गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे अनेक व्हिडिओही त्याने शेअर केले होते. 

समुद्रकिनाऱ्यावर मज्जा मस्ती करताना, मुलांकडून रामरक्षा स्त्रोत पठण करतानाचा व्हिडिओ अभिजीतने शेअर केला होता. आता त्याने व्हिडिओतून त्याच्या कोकणातील कौलारू घराची झलक दाखवली आहे. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन गावातील घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याचं छोटंसं गावचं घर पाहायला मिळत आहे. अभिजीतचं गावचं घर साध्या पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे. माती-विटांचं बांधकाम असलेल्या घराला कौलारू झप्पर असल्याचं दिसत आहे. घरापुढे शेणाने सारवलेलं छोटं अंगणही दिसत आहे. 

अभिजीतने शेअर केलेल्या व्हिडिओत घरात एन्ट्री घेताना शेजारी बसण्यासाठी छोटी जागा केल्याचं दिसत आहे. घरात एन्ट्री घेतल्यानंतर प्रशस्त हॉल आहे. हॉलमध्ये जुन्या पद्धतीचं फर्निचर आणि देवांचे फोटो लावल्याचं दिसत आहे. घराला छोट्या खिडक्याही असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला अभिजीतने "ऐरणीच्या देवा" हे गाणंही दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, अभिजीत 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आला. अलिकडेच तो 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साहेबराव ही भूमिका साकारली होती. 

 

टॅग्स :अभिजीत केळकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी