Join us  

मनीष पॉल आहे हा अभिनेत्याचा सगळ्यात मोठा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 5:31 PM

एरव्ही धमाल मस्ती करणारा सूत्रसंचालक मनीष पॉल इंडियन आयडलमधील या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी पहिल्यांदाच भावनावश झाला, जेव्हा त्याच्या आई वडिलांनी इंडियन आयडल 10 च्या सेटवर येऊन आश्चर्याचा धक्का दिला.

आईचे प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भेट आहे आणि इंडियन आयडल 10 च्या आगामी ‘माँ स्पेशल’ भागात सर्वोत्तम 11 स्पर्धक आपल्या परफॉर्मन्सने या मातृत्व भावनेस वंदन करणार आहेत. एरव्ही धमाल मस्ती करणारा सूत्रसंचालक मनीष पॉल या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी पहिल्यांदाच भावनावश झाला, जेव्हा त्याच्या आई वडिलांनी इंडियन आयडल 10 च्या सेटवर येऊन त्याला आश्चर्याचा धक्का दिला. मनीषने या भागात आपल्या लहानपणीच्या आणि संघर्षाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. मनीषने सांगितले की, तो काही वर्षांपूर्वी दुकानामध्ये काम करायचा, त्यावेळी लोक त्याच्या आई-वडिलांना चिडवायचे की, तो त्यापेक्षा विशेष असे काहीच करू शकणार नाही. पण आज मनीष यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याने आजवर अनेक रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. आज तो इंडियन आयडॉल या भारतातील सर्वात मोठ्या रियालिटी कार्यक्रमाचे देखील सूत्रसंचालन करत आहे आणि त्याच्या विशेष स्टाइल आणि विनोदामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे.

मनीषने यावेळी एक गंमतीशीर घटना सांगितली. तो जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हा त्याला अमिताभ बच्चन खूप आवडत असे. तो आपल्या छातीवर लाल मार्करने ‘मर्द’ असे लिहीत असे आणि आपल्या आसपासच्या मुलांमध्ये ते दाखवून मिरवत असे. त्याच्या आईने सांगितले की, मनीष वेगवेगळी फिल्म मॅगझिन जमा करायचा आणि एकदा तर त्याने ‘मेरा बाप चोर है’ असे देखील लिहिले होते, ज्यावरून त्याच्या वडिलांनी त्याला चांगलाच मार दिला होता.

मनीष पॉलने सांगितले, “हा खूप भावनिक एपिसोड होता. पहिल्यांदाच माझे आई-वडील मंचावर आले होते. त्यांच्यासोबत माझ्या लहानपणीच्या खूप गोड आठवणी आहेत आणि त्यांना माझ्यासमोर पाहून मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही आहे. मला आठवते की, मी एक खूप खट्याळ मुलगा होतो आणि अमिताभ बच्चन माझे दैवत होते. त्यांचे चित्रपट बघून मी त्यांचीही नक्कल करायचो. मी जेव्हा दिल्लीहून मुंबईस आलो, तेव्हा माझी आई चिंतेत पडली होती की इतक्या मोठ्या शहरात माझा निभाव कसा लागेल? पण आता तिला आनंदात आणि निवांत पाहताना मला आनंद होत आहे.”

टॅग्स :मनीष पॉलइंडियन आयडॉल