Join us

लागीर झालं जी या मालिकेतील जीजी खऱ्या आयुष्यात आहेत शिक्षिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:40 IST

एक मुख्याध्यापिका, ज्या आपल्या शैक्षणिक कार्यकर्तृत्वाने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवतात... एक नाट्य कलावंत, ज्या इस्कोट या नाटकासाठी राज्य नाट्य ...

एक मुख्याध्यापिका, ज्या आपल्या शैक्षणिक कार्यकर्तृत्वाने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवतात... एक नाट्य कलावंत, ज्या इस्कोट या नाटकासाठी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्य पदक मिळवतात... एक चित्रपट अभिनेत्री, ज्यांनी बाबा लगीन या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळवतात... आणि एक दूरदर्शन अभिनेत्री, ज्यांनी आज "लागीर झालं जी" या गाजत असलेल्या मालिकेतील "जीजी" च्या भूमिकेसाठी पुरस्कार खेचून आणलाय....हे सर्व मिळवणारी व्यक्ती एकच आहे यावर विश्वास बसणार नाही पण कमल गणपती ठोके या वय वर्षं फक्त बहात्तर असलेल्या अभिनेत्रीने हे साध्य केले आहे. मी वर दिलेली यादी इथेच संपत नाही. त्यांनी आयुष्यात काय केले आहे हे वाचल्यावर आपण केवळ थक्क होतो. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. पण शिक्षणाच्या आवडीमुळे रात्रशाळेत जाऊन जुनी अकरावी पूर्ण केली आणि गणपती ठोके या शिक्षकांबरोबर विवाह झाल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठातून एम ए पर्यंत शिक्षण घेतले. शिवाय तिथेच अध्यापनशास्त्राचेही शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून ३३ वर्षं नोकरी केली. २००५ मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते मिळाला होता. ठोकेबाईंना अगदी लहानपणापासून अभिनयाची आणि संगीताची आवड होती. पूर्वी गणेशोत्सवात मेळे व्हायचे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांनी शाहीर यादव यांच्या मेळ्यात कामे केली. संगीत कलेचे त्यांना एवढे वेड होते की, एकदा लहान असताना घरावरून कोका हे वाद्य वाजवणाऱ्या विक्रेत्याच्या मागेमागे गेल्या आणि चुकल्या. संगीताचे शास्त्रीय शिक्षण काही त्यांना घेता आले नाही पण दिलेल्या पट्टीत गायचे ही एकलव्याची साधना मात्र प्रामाणिकपणे केली. त्यातही विशेष म्हणजे ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडून कला सादर करत नसत, तेव्हा त्या बिस्मिल्ला ब्रास बँड मध्ये गायच्या. त्यानंतर त्यांनी गावोगाव भक्तीगीतांचे कार्यक्रमही केले. ठोकेबाईंचे पती संवादिनी वाजवतात आणि त्या आपल्या दोन्ही मुलांसमावेत आजही गातात. नोकरी सुरू असतानाही त्यांनी घर, संसार आणि कला या सर्वांची अतिशय उत्तम पद्धतीने सांगड घातली. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक नाटकात त्यांनी अभिनय केला. इस्कॉट या नाटकासाठी त्यांना भक्ती बर्वे यांच्या हस्ते अभिनयाचे रजत पारितोषिक मिळाले होते. १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे शा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण संपूर्ण महाराष्ट्राला त्या माहीत झाल्या त्या लागीर मधल्या जीजी च्या भूमिकेमुळे ! रंगभूषेशिवाय असणारा अत्यंत बोलका चेहरा, चेहऱ्यावरील अकृत्रिम भाव, पाणीदार डोळे, आवाजातील मार्दवता आणि सच्चेपणा त्याचप्रमाणे अभिनयातील प्रचंड सहजता ही त्यांची वैशिष्ट्यं! पूर्वीच्या काळी असे म्हटले जाई की, आई असावी सुलोचना बाईंसारखी, बहीण किंवा वहिनी असावी आशा काळे यांच्यासारखी आणि पत्नी असावी सीमा देव यांच्यासारखी. आज त्याच चालीवर आपण म्हणू शकतो आजी असावी कमल ठोके यांच्यासारखी! खरे तर आजी या शब्दात मुळात गोडवा आहे पण त्याहीपेक्षा "जीजी" हा शब्द अधिक जवळचा वाटतो. आजवर फक्त ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या या शब्दाला संपूर्ण महाराष्ट्राला परिचित करून दिले ते या भूमिकेने! कोणीही आपल्या मनातले गुपित, खंत, इच्छा, आकांक्षा या हक्काने येऊन सांगाव्यात इतकी जवळीक या भूमिकेने निर्माण केली. ही भूमिका लिहिणारे तेजपाल वाघ, दिग्दर्शक संजय खांबे, निर्मात्या श्वेता शिंदे या तिघांबरोबर ठोके बाईंचेही योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळे यावर्षीचा झी गौरव पुरस्कार हा फक्त त्यांच्यासाठीच होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.चित्रपटसृष्टी म्हणजे भुलभुलैय्या! ते एकप्रकारे व्यसनच आहे, तो एक चक्रव्यूह आहे. त्यात आत जाता येते पण बाहेर पडता येत नाही. पण ठोके बाई आपली नोकरी आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून या क्षेत्रात कार्यरत राहिल्या. त्यामुळे कोणालाही बोट दाखवायला त्यांनी जागा ठेवली नाही. त्यांचा मुलगा डॉ. सुनील जजीत (त्याने आपले आडनाव बदलले आहे) हा माझा वर्गमित्र.  अत्यंत बुद्धिमान!  माझे आजोबा म्हणायचे माणसाने मैत्री नेहमी आपल्यापेक्षा हुशार व्यक्तीशी करावी. त्यांचे म्हणणे शिरसावंद्य मानून डॉ सुनीलचा शर्ट पकडून काही मार्ग चालण्याचा प्रयत्न केला. पण दमछाक झाल्याने वेगळा मार्ग निवडला आणि पोटापाण्याच्या उद्योगाला लागलो. डॉ सुनील मात्र मेकॅनिकल इंजिनिअर झाला, नंतर त्याच विषयात डॉक्टरेट केली आणि आज बेंगलोरमध्ये मल्टिनॅशनल कंपनीमध्ये फार मोठ्या हुद्यावर आहे. शिवाय तो उत्कृष्ट गातो आणि संवादिनीसुद्धा वाजवतो! शिवाय आपले काम सांभाळून गझल गायनाचे कार्यक्रम करतो. तसेच तो मोटिव्हेशनल स्पीकर आहे. अनेक कंपन्या त्याला शिबिरे घ्यायला बोलावतात. ठोके बाईंची मुलगी संगीता बी फार्म होऊन शासकीय नोकरीमध्ये उच्च पदावर आहे. त्यांच्या सदैव पाठीशी असणारे त्यांचे पती गणपती ठोके हे सेवानिवृत्त जीवन संगीताच्या माध्यमातून जगत आहेत. जशी यशस्वी पुरुषामागे स्त्री असते तसा यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो असे म्हणायला काही हरकत नाही.मालिकांचे क्षेत्र म्हणजे अळवावरचे पाणी! त्यातील प्रसिद्धी तेवढ्यापुरतीच असते. मालिका संपली की, सगळेच विस्मृतीत जाते पण ठोकेबाईंनी जीजी या भूमिकेचा असा काही ठसा मराठी मनावर उमटवलाय की, ती भूमिका विसरणे केवळ अशक्य!जाताजाता हेही सांगतो उद्या आणि परवा "चला हवा येऊ द्या" मध्ये जीजींना प्रत्यक्ष पहा आणि अनुभवा! दोन्ही एपिसोडमध्ये त्यांना दिलेले महत्व हे त्यांच्या भूमिकेचे वजन अधोरेखित करते.- अभय देवरे (सातारा)Also Read : 'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? खाली कमेंट देऊन कळवा