पूजा कार्तु़डे (Pooja Kartude ) मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अहिल्याबाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का? या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती बबन, ती वेळ या सिनेमांतही झळकली आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर अॅक्टर असल्यामुळे तिला भाडेतत्वावर राहण्यासाठी घर मिळत नसल्याचे सांगितले आहे.
पूजा कार्तुडेने इंस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे, यात तिने कलाकार असल्यामुळे घर भाडेतत्वावर मिळत नसल्याचा संताप व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, ''माझ्या जुन्या मालकाने प्लॅट विकला. नवीन घराच्या शोधात निघाले. हाउसिंग, 99 एकेर्स, ब्रोकर, परिसर सगळीकडे फोन, फ्लॅट पाहिले, वेळ, एनर्जी सगळं दिलं. शेवटी १-२ फ्लॅट्स फायनल केले. पण काय झालं? मालक डिटेल्स घेतो आणि अचानक उत्तर येतं. ओह नो, अॅक्टर नको आहे! त्यात फिमेल अॅक्टर? म्हणजे फिमेल अॅक्टर असल्यामुळे घर नाकारलं जातं? दुसऱ्या ठिकाणी गेलं, तिथे दुसऱ्या मालकाने हो म्हटले. पण जेव्हा बिल्डरकडून डिटेल्स मागवले. तेव्हा बिल्डर म्हणतो सिंगल आहे? अॅक्टर आहे? मग नाहीच! अजून एके ठिकाणी सोसायटी कमिटीच्या बुद्धीमान सदस्यांना माझं अॅक्टर असणं समस्या वाटते.''
ती पुढे म्हणाली की,'' म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? अॅक्ट्रेस म्हणजे गोंधळ? सिंगल म्हणजे संशयास्पद? तुम्ही आम्हाला बघता फक्त टीव्हीवर, स्क्रीनवर... पण रिअल लाइफमध्ये आम्हाला रिजेक्ट करता. कारण आम्ही अॅक्टर आहोत. तुमच्या सोसायटीत पती-पत्नी एकमेकांवर ओरडतात, केससुद्धा चालू असतात... पण प्रॉब्लेम आहे अॅक्टर्समध्ये? काय भोंदू विचार आहेत हे? तुमच्या सोसायटीमध्ये मुली नाहीत का? कोण राहिलं नाही का स्वतःचं करिअर करत? मुंबईसारख्या शहरातही अजून स्टिरिओटाइप? काय शरम वाटत नाही? मग कुठे राहावं आम्ही? काय वाटतं तुम्हाला? अॅक्टर म्हणजे नाचणारे-गाणारे? म्हणजे गोंधळ? म्हणजे बदमाश? म्हणजे कॅरेक्टरलेस?''
''घर हवंय... दया नको''''मालकांना अॅक्टर नको. बिल्डर्सना सिंगल नको. तुम्ही कोण आहात ठरवणारे आम्ही कुठे राहायचे ते? भाडं वेळेवर देणारी व्यक्ती नको कारण ती महिला आहे, एकटी राहते आणि कलाकार आहे- म्हणजे एवढंच का कमी पाप? घर विकायचंय, भाड्याने द्यायचंय... पण जजमेंटसह. तुमच्या घरात सगळे व्यवस्थित लग्न करून, नोकरी करुन राहतायेत का? शर्म वाटली पाहिजे असा भेदभाव करताना. मी घर शोधतेय... आणि घर नाकारलं जातं कारण मी स्वावलंबी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वप्नांवर जगते. मग सांगा... लग्न करुन येऊ? घर देणार का मग? मी अभिनेत्री आहे. सिंगल आहे. स्वतंत्र आहे. कोणालाही भीक नाही मागते. घर हवं आहे- दया नको'', असेही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.