Join us  

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची रसिकांना मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:00 PM

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमा हा विषय दोन दिग्गजांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि  विनोदाचे जहागिरदार दादा कोंडके हेच ते दोन 'विनोदाचे बाप' आहेत.

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमा हा विषय दोन दिग्गजांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि  विनोदाचे जहागिरदार दादा कोंडके हेच ते दोन 'विनोदाचे बाप' आहेत. 'झी टॉकीज' विनोदी चित्रपटांचा एक संपूर्ण आठवडा घेऊन येत आहे. १० मार्च पासून १६ मार्चपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता 'झी टॉकीज'वर या विनोदवीरांचे चित्रपट पाहता येतील. 'विनोदाचे बाप'मध्ये 'पळवा पळवी', 'अशी ही बनवाबनवी', 'धडाकेबाज', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'मला घेऊन चला', 'माझा छकुला', 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटांचा समावेश असणार आहे. लक्ष्या व दादा कोंडके यांच्या या एव्हरग्रीन सिनेमांचा मनमुराद आनंद लुटण्याची नामी संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

दादा कोंडके यांचे दिग्दर्शन व अभिनय अशी दुहेरी मेजवानी असलेला 'पळवा पळवी' हा चित्रपट १० मार्चला पाहता येईल. 'बनवाबनवी' करण्यासाठी, लक्ष्याने साकारलेली 'पार्वती', 'अशी ही बनवाबनवी'मध्ये भरपूर धमाल करते. साऱ्यांच्या लाडक्या लक्ष्याचा हा चित्रपट, प्रेक्षकांना हसवून लोटपोट करतो. हा सिनेमा पाहण्याची संधी ११ मार्चला मिळणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गंगाराम व लक्ष्या अशा दोन भूमिका असणारा 'धडाकेबाज' चित्रपट, ही तीन मित्रांची कथा आहे. कवट्या महाकालशी तिघा मित्रांनी दिलेल्या लढ्यात काय धुमाकूळ होतो ते पाहणे मजेशीर ठरते. एक बेवारस बाळ सापडल्याने, दोन मित्रांची उडालेली तारांबळ पाहण्याची संधी 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' या चित्रपटातून मिळते. एक गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तमप्रकारे मांडला आहे. दादा कोंडके व मधू कांबीकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मला घेऊन चला', या यादीतील पुढील चित्रपट आहे. 'विनोदाचे बाप' या धमाकेदार आठवड्याचा शेवट 'आयत्या घरात घरोबा' या सिनेमाने होणार आहे. संपूर्ण वेळ हसवणारा व शेवटी छोटीशी शिकवण देऊन जाणारा हा चित्रपट अवश्य पाहावा असाच आहे. लक्ष्याच्या सोबतीने सचिन व सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे