‘लागीरं झालं जी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार कसम परेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 13:04 IST
‘लाखात एक आपला फौजी’ असे म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेला येत्या १ मे ला ...
‘लागीरं झालं जी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार कसम परेड
‘लाखात एक आपला फौजी’ असे म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेला येत्या १ मे ला एक वर्षं पूर्ण होत आहे. या एक वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे. त्याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना या मालिकेत दाखवला आहे. आर्मीचे प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. तर नऊ दहा महिन्याचे आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलं देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थाने फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावाने ओळखला जातो. हा सोहळा फक्त फौजींच्या कुटुंबीयांनाच अनुभवायला मिळतो. पण अजिंक्य शप्पथ घेताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहावं यासाठी झी मराठी आणि वज्र प्रॉडक्शनने भारतीय संरक्षण खात्याकडे या कसम परेडच्या चित्रीकरणाची परवानगी मागितली. लागीरं झालं जी च्या निमित्ताने हजारो तरुण सैन्यात भरती होऊ पाहतायत हे पाहून भारतीय संरक्षण खात्याकडून लागीरं झालं जी या मालिकेला चित्रीकरणाची परवानगी दिली. आणि शप्पथविधीचा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्याची सुवर्ण संधी संपूर्ण महाराष्ट्राला मिळाली. आर्मी ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या चारशे साडे चारशे मुलांसोबत अजिंक्यनेसुद्धा देशसेवेची शप्पथ घेतली. मालिकेच्या माध्यातून अशाप्रकारचा शपथविधी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दाखवला जातोय. या शप्पथविधी सोबतच मराठा लाईट इंफन्ट्री, बेळगाव येथे देखील काही चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या दरम्यान अजिंक्यला काही चित्तथरारक दृश्य साकारावी लागणार आहेत. हे करत असतानाचा खरीखुरी रायफल अजिंक्यच्या डोक्यात लागून त्याला थोडी दुखापतही झाली. तसेच युद्धाचे चित्रीकरण करत असताना बॉम्ब स्फोट झाल्यांनतर उडालेल्या ठिणग्यामधून सेटला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. अशा अनेक अडचणीवर मात करत सैन्याच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता लागीरं झालं जी च्या टीमने चित्रीकरण पूर्ण केले. आपल्या फौजी बांधवांचे कष्ट आणि त्यांचा संघर्ष सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लागीरं झालं जी ची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. Also Read : लागीरं झालं जी या मालिकेत शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकरला या मालिकेसाठी मिळते इतके मानधन