Join us

KBC 17: भाषेशी संबंधित ७ लाख ५० हजारांचा प्रश्न; स्पर्धकाचं उत्तर चुकलं, तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:09 IST

'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीझनमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत.

KBC 17: 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) चा १७ वा सीझन ११ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे या सीझनचेही सुत्रसंचालन महानायक अमिताभ बच्चन करत आहेत. अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत मनसोक्त गप्पा मारतात. त्यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते. आपल्या ज्ञानाच्या आणि हिंमतीच्या जोरावर स्पर्धक शानदार खेळ खेळून लाखो रुपये जिंकतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये  'कौन बनेगा करोडपती १७' च्या ८ सप्टेंबरच्या भागात आयएएस होण्याचे स्वप्न पाहणारा अभिषेक पोहचला होता. पण,  ७.५ लाख रुपयांच्या प्रश्नावर तो अडकला आणि त्याला खेळ सोडावा लागला.

सध्या पदवीचे शिक्षण घेत असलेला अभिषेक आपल्या कुटुंबासोबत एका खोलीच्या घरात राहतो आणि त्याचे स्वप्न आहे की तो आयएएस अधिकारी बनून आपल्या कुटुंबासाठी एक घर खरेदी करेल. अभिषेकने आत्मविश्वासाने खेळाची सुरुवात केली. पण,५०,००० रुपयांच्या प्रश्नावर त्यानं पहिली लाइफलाइन 'ऑडियन्स पोल' वापरली.  तो प्रश्न होता की "हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूचे रत्न, कौस्तुभ कसे मिळाले?" प्रेक्षकांच्या मदतीने त्याने योग्य उत्तर 'समुद्र मंथन' दिले. 

अभिषेकने त्यानंतर त्याने १ लाख रुपयांच्या प्रश्नावर दुसरी लाइफलाइन वापरली. ३ लाख रुपयांच्या प्रश्नावर '५०:५०' लाइफलाइन वापरून तो ५ लाख रुपयांपर्यंत पोहोचला. ५ लाख रुपयांच्या प्रश्नानंतर त्याने सुपर सँडूक फेरीमध्ये सहा प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. पण, अभिषेक ७.५ लाख रुपयांच्या प्रश्नावर अडकला. तो प्रश्न होता की "कोणत्या देशाची राष्ट्रीय भाषा ही प्रमुख जातीय समूहाद्वारे बोली जाणाऱ्या तागालोग भाषेतून विकसित झाली आहे?" या प्रश्नासाठी दिलेले पर्याय होते कीअ. मलेशिया, ब. फिलीपिन्स, क. लाओस, ड. इंडोनेशिया. अभिषेककडे फक्त एकच ऑडियन्स पोल ही लाइफलाइन शिल्लक होती. त्याचा वापर करून त्याने पर्याय 'सी', म्हणजे 'लाओस' निवडला. पण, दुर्दैवाने हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर 'फिलीपीन्स' होते. चुकीच्या उत्तरामुळे अभिषेकला येथेच खेळ सोडावा लागला, पण तरीही तो ५ लाख रुपये घेऊन घरी परतला. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन