Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खूप उंच आहात, घरात पंखे तुम्हीच पुसता का? छोट्या स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 08:46 IST

केबीसीच्या मंचावर छोट्या स्पर्धकांचे अमिताभ बच्चन यांना एकापेक्षा एक धमाल प्रश्न

कौन बनेगा करोडपती १३ मध्ये (KBC13) सध्या अनेक लहान मुलं स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहेत. हा आठवडा स्टुडंट स्पेशल असून प्रोमोजमधून त्याची झलक दिसू लागली आहे. लहानग्यांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रश्न विचारून बीग बींची विकेट काढली आहे. हॉटसीटवर बसलेल्या मुलांचे प्रश्न ऐकून अनेकदा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) निरुत्तर झाले.

सोनी टीव्हीनं कौन बनेगा करोडपतीच्या स्टुडंट स्पेशलचे काही प्रोमोज  इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये एका स्पर्धकानं बिग बींवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तुमची उंची खूप जास्त आहे. मग घरातले पंखे तुम्हीच साफ करता का?, असा भन्नाट प्रश्न स्पर्धकानं विचारला. हा स्पर्धक एकच प्रश्न विचारून थांबला नाही. 'तुम्ही आराध्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमाला जाता. तेव्हा बाकीचे लोक कार्यक्रम पाहतात की तुम्हालाच पाहतात? अभ्यास न केल्यानं तुम्हाला आईनं कधी मारलं होतं का?', असे प्रश्न छोट्या स्पर्धकानं विचारले. त्यावर हा खूपच गुणी माणूस आहे. हा माझी पोलखोल करेल, असं उत्तर अमिताभ यांनी हसत हसत दिलं.

केबीसीच्या आणखी एका प्रोमोमध्ये मानस नावाच्या स्पर्धकाचा समावेश आहे. त्याचे विचार ऐकून अमिताभ चकित झाले. लोकांकडे कल्पना असतात. पण आर्थिक पाठबळ नसतं. त्यामुळे मला स्टार्ट अप कल्चरला प्रोत्साहन द्यायचं आहे, उद्योजकांना पुढे आणायचं आहे, असं मानस म्हणाला. त्याचे विचार ऐकून बिग बी निशब्द झाले. १५ वर्षांचा मुलगा काळाच्या पुढच्या विचार करतो यावर अनेकजण विश्वास ठेवत नाहीत, असंही मानस पुढे म्हणाला. मानस केबीसीमध्ये १ कोटी पॉईंट्सपर्यंत पोहोचला.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन