Join us  

'जंजीर' सिनेमासाठी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांना का निवडलं? च्युईंगमसोबत आहे कनेक्शन....

By अमित इंगोले | Published: November 24, 2020 9:26 AM

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांचे सिनेमे फार खास चालत नव्हते आणि साधारण ५-६ सिनेमे फ्लॉप झाले होते.

KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत गेम खेळता-खेळता आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफचे किस्सेही शेअर करत असतात. नुकताच सौरभ कुमार या शोमध्ये येऊन गेला. खेळ खेळत असताना मन्ना डे यांनी गायलेली कव्वाली 'यारी है ईमान' लावण्यात आली आणि सौरभला सांगायचं होतं की, ही कोणत्या सिनेमातील कव्वाली आहे.  कव्वाली अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध सिनेमा 'जंजीर' मधील आहे. सौरभला या प्रश्नाच्या उत्तराबाबत जराही शंका नव्हती. यानंतर अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा एक खास किस्साही सांगितला.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांचे सिनेमे फार खास चालत नव्हते आणि साधारण ५-६ सिनेमे फ्लॉप झाले होते. नंतर त्यांना 'जंजीर' सिनेमात काम करण्यासाठी बोलवण्यात आलं. सिनेमाचे लेखक जावेद-सलीम यांना अमिताभ बच्चन यांनी विचारले की, हा इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा आहे. आधीचे अनेक सिनेमे फ्लॉप झाल्यावरही या सिनेमात मला का कास्ट करण्यात आलं?

अमिताभ यांना यावर जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं की, त्यांनी 'बॉम्बे टू गोवा' सिनेमात अमिताभ बच्चन यांचा एक सीन पाहिला होता. ज्यात ते च्युईंगम खात असतात आणि त्याच दरम्यान त्यांना कुणीतरी मारतं. ते पुन्हा उठतात आणि पुन्हा च्युईंगम खातात. त्यानंतर पुन्हा त्यांना मार पडतो ते पुन्हा उठतात आणि तेव्हाही च्युईंगम खात राहतात. हा सीन पाहूनच जावेद अख्तर यांना वाटलं होतं की, अमिताभ 'जंजीर' साठी फिट अभिनेता आहे.

जंजीरमधून मिळाली होती एंग्री यंग मॅन ओळख

अमिताभ म्हणाले की, त्यांना 'जंजीर' सिनेमात घेण्याचं आणि च्युईंगमचं कनेक्शन आजपर्यंत समजलं नाही. दरम्यान 'जंजीर' सिनेमातून अमिताभ बच्चन यांनी करिअरमध्ये यशाचं पहिलं पाऊल पुढे टाकलं. यातील त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं आणि याच सिनेमातून त्यांना एंग्री यंग मॅनची ओळख मिळाली. या सिनेमात त्यांच्यासोबत जया बच्चन आणि प्राण यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावरच मन्ना डे यांनी गायलेली कव्वाली शूट करण्यात आली होती. 

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीबॉलिवूड