Join us  

करिष्मा कपूरला ‘झाँझरिया’ या हिट गाण्यासाठी तब्बल 30 वेळा बदलावे लागले होते कपडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 5:27 PM

‘झाँझरिया’ या गाण्याचे चित्रीकरण करताना किती अडचणी आल्या ते यावेळी करिष्माने सांगितले.

‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’ या कार्यक्रमातील 10 स्पर्धकांनी सादर केलेल्या अफलातून नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस व भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तार यांनी या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून त्यांच्यातील खेळीमेळीचे नाते आणि सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिप्पण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे; कारण करीना कपूर-खानच्या ऐवजी तिची बहीण सौंदर्यवती करिष्मा कपूर ही अतिथी परीक्षक म्हणून पुन्हा एकदा या वीकेण्डच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. याशिवाय या ‘अंदाज अपना अपना’  विशेष भागात या सर्वांच्या जोडीला शक्ती कपूरही आपल्या मिश्किल वागण्या-बोलण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

सर्वच स्पर्धकांनी काही अप्रतिम नृत्याविष्कार सादर केले तरी करिष्माला ‘सोल क्वीन’ या स्पर्धकाने सादर केलेल्या ‘झाँझरिया’  या गाण्यावरील नृत्याने भारावून टाकले. या स्पर्धकाने हे गाणे अप्रतिमपणे सादर करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि तिच्या अफलातून सादरीकरणामुळे करिष्मा भारावून गेली. त्यामुळे तिच्या मनात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळच्या काही आठवणी जाग्या झाल्या. या गाण्याचे चित्रीकरण करताना किती अडचणी आल्या ते यावेळी करिष्माने सांगितले.

करिष्मा कपूर म्हणाली, “हे गाणं पुरुष आणि महिला या दोघांच्या आवाजात आहे. यातील पुरुषाच्या आवाजातील गाण्याचं चित्रीकरण एका वाळवंटात करण्यात आलं आणि तेव्हा बाहेरचं तापमान 50 अंश सेल्सियस इतकं होतं. महिलेच्या आवाजातील गाण्याचं चित्रीकरण मुंबईत तीन दिवस चाललं होतं. वाळवंटात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी वाळू उडून  डोळ्यांत जात असे आणि त्यामुळे डान्स करताना अडचण होत असे.

 

मुंबईत जेव्हा आम्ही या गाण्याचं चित्रीकरण करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की केवळ या एका गाण्यासाठी मी 30 वेळा कपडे बदलले आहेत. यातील प्रत्येक कपड्याबरोबर माझी केशभूषा आणि मेक-अपही बदललेला होता. या गाण्यावरील प्रत्येक स्टेप्स अवघडच होत्या.. त्यामुळे झांझरिया हे केवळ एक सुपरहिट गाणं नव्हतं, तर माझ्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय गाणंही राहिलं आहे.”

तसेच यावेळी करिष्माबरोबर केलेल्या चित्रीकरणांच्या आणि 'अंदाज अपना अपना'च्या चित्रीकरणाच्या आठवणी अतिथी परीक्षक व सुपरस्टार खलनायक शक्ती कपूरने सांगितल्या. यावेळी ‘ये रात और ये दूरी’ या गाण्यावर करिष्माबरोबर डान्स करून कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण वाहीने आपले बालपणापासूनचे एक स्वप्न पूर्ण केले. मुकुल गैनने यावेळी ‘परदेसी परदेसी’  या गाण्यावर सादर केलेल्या अप्रतिम डान्सने सा-यांनाच मंत्रमुग्ध केले होते. 

टॅग्स :करिश्मा कपूर