अर्जित तनेजा आणि आदिती शर्मा झळकणार कालीरेन या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 14:24 IST
विवाह हे अंतिम स्थान नसून दोन व्यक्तींनी एकत्र मिळून केलेल्या एका नव्या प्रवासाची ती सुरुवात असते, असे म्हटले जाते. ...
अर्जित तनेजा आणि आदिती शर्मा झळकणार कालीरेन या मालिकेत
विवाह हे अंतिम स्थान नसून दोन व्यक्तींनी एकत्र मिळून केलेल्या एका नव्या प्रवासाची ती सुरुवात असते, असे म्हटले जाते. या दोन व्यक्ती परिपूर्ण नसतात, पण आपल्या वैयक्तिक आवडीनुसार किंवा समाजाच्या रूढ संकल्पनांनुसार दुसऱ्याला बदलविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते दोघांतील अपरिपूर्णतेतीलच पूर्णत्व शोधतात. असे असेल, तर चांगला पती मिळविण्यासाठी एखाद्या मुलीने आपण जसे आहोत, त्यापेक्षा वेगळे आहोत, असे दाखविण्याचा का प्रयत्न करावा? या विचारसरणीवर आधारित ‘झी टीव्ही’ ‘कालीरेन’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. नातेसंबंध म्हणजे काय आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याचा रूढमान्य संकल्पनेपेक्षा अगदी वेगळा विचार देणाऱ्या पंजाबातील एका छोट्या गावातील मीरा नावाच्या एका मुलीची ही कथा आहे. निखिल सिन्हा यांच्या ट्रायँगल फिल्म्सने कालीरेनची निर्मिती केली असून ५ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समाजाच्या उत्तमतेच्या समजुतीनुसार उत्तम पती मिळविण्यासाठी मुलींमध्ये बदल घडवणाऱ्या शाळांचे पंजाबमध्ये पेव फुटले आहे. उत्तम आणि भावी नवऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी वधू कशी असावी, याचे प्रशिक्षण त्यात दिले जाते आणि मुलींना त्यांच्या स्वभावाविरोधात आपल्यात बदल करून घेण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु स्वच्छंदी आणि मनस्वी स्वभावाची, आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याची इच्छा असलेली मीरा आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वात असे बदल घडविण्यास नकार देते आणि आपण जसे आहोत, तसाच आपला स्वीकार करणाऱ्या पतीची प्रतीक्षा करते, असे या मालिकेचे कथानक आहे. ही मालिका प्रेक्षकांना मीराच्या या जगावेगळ्या जीवनप्रवासाच्या सफरीवर घेऊन जाणार आहे. विवाहानंतर सुरू होणाऱ्या एखाद्या स्त्रीच्या नव्या जीवनाचा प्रारंभ हा पारदर्शकता आणि परस्पर सामंजस्याच्या पायावर करण्यापेक्षा पतीच्या इच्छेनुसार आपण अगदी अनुरूप आहोत, असे भासवून उत्तम वर मिळविण्याच्या खटपटींवर आधारित कसा होत आहे, हे यात दाखविण्यात आले आहे. या मालिकेतील मीरा या स्वच्छंदी नायिकेची भूमिका आदिती शर्मा ही नवी अभिनेत्री साकारणार असून अर्जित तनेजा हा लोकप्रिय अभिनेता यात नायकाच्या भूमिकेत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्यामुळे आदिती शर्मा प्रचंड खूश आहे. ती सांगते, “आपल्या देशात विवाह होण्यापूर्वी सर्व मुलींचे एका आदर्श वधूमध्ये रुपांतर करण्याचा प्रचंड मोठा खटाटोप सुरू होतो. परंतु समाजाच्या या रूढींच्या दबावाला बळी न पडता आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याच्या मीराच्या निर्णयाशी मी पूर्णत: सहमत आहे. कालीरेनमधील ही भूमिका मी मीराच्या या स्वतंत्र बाण्याच्या आणि वैयक्तिक व्यक्तिरेखेच्या आकर्षणामुळेच स्वीकारली. ही व्यक्तिरेखा उभी करण्यास मी उत्सुक झाले आहे.”