सेटवरच बेशुद्ध पडला कपिल शर्मा; रुग्णालयात उपचार सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 10:15 IST
कॉमेडियन कपिल शर्मा याला कधी सुखद, तर कधी दु:खद धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या शोमध्ये भारती सिंग आणि ...
सेटवरच बेशुद्ध पडला कपिल शर्मा; रुग्णालयात उपचार सुरू!
कॉमेडियन कपिल शर्मा याला कधी सुखद, तर कधी दु:खद धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या शोमध्ये भारती सिंग आणि तिचा जुना जोडीदार चंदन प्रभाकर परतल्याने त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. अशात तो अधिक मेहनत करून ‘द कपिल शर्मा’ शोला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी धडपड करीत आहे. सध्या त्याचे शेड्यूल प्रचंड बिझी आहे. एकीकडे आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या शूटिंगला त्याला पुरेसा वेळ द्यावा लागत आहे, तर दुसरीकडे त्याच्या शोचीदेखील त्याला शूटिंग करावी लागत आहे. त्यामुळे त्याला प्रकृतीवर लक्ष देणे अशक्य होत आहे. ‘द कपिल शर्मा’ या शोच्या एका एपिसोडची शूटिंग करताना तो सेटवर बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या एपिसोडमध्ये शाहरूख खान आणि इम्तियाज अली त्यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. मात्र कपिलची तब्येत बिघडल्याने शाहरूख आणि त्याच्या टीमला शूटिंग न करताच परतावे लागले. टीओआयने दिलेल्या माहितीनुसार कपिलची तब्येत खूपच बिघडत होती. त्याला बॅकस्टेजमधून थेट अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे लागले. या बातमीला किकू शारदा याने दुजोरा दिला असून, अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा कपिलच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समजले. दरम्यान, कीकू शारदाने ‘टीओआय’शी बोलताना म्हटले की, गेल्या रात्री शाहरूख प्रोमोच्या शूटिंगसाठी फिल्मसिटी येथे आला होता. शाहरूख सेटवर पोहोचताच कपिलला चेकअपकरिता घेऊन जाण्यात आले होते. कपिलची तब्येत अचानक बिघडली होती. जेव्हा डॉक्टरांनी कपिलला तपासले तेव्हा त्यांनी त्याला अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. सध्या कपिल रुग्णालयात असून, त्याच्यासोबत त्याचा संपूर्ण परिवार आहे. आता या शोची शूटिंग ११ आणि १३ जुलै रोजी होणार आहे. मात्र मी हे खात्रीने सांगू शकत नाही की, त्यावेळी कोणत्या चित्रपटाची कास्ट आमच्यासोबत असेल, असेही किकूने स्पष्ट केले.