Join us  

कपिल शर्मा सांगतोय, या बॉलिवूड अभिनेत्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 12:30 PM

कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमात सुरुवातीला सेलिब्रेटींना बोलावणे हे खूपच अवघड काम होते असे कपिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. 

ठळक मुद्देधर्मेंद्र यांचे मी उपकार कधीच विसरू शकत नाही. माझ्या कार्यक्रमात कोणीच सेलिब्रेटी येत नव्हते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी माझ्या कार्यक्रमात हजेरी लावून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

कपिल शर्माला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कॉमेडी सर्कसच्या अनेक सिझनचे विजेतेपद मिळवले.  2013 मध्ये त्याने कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावरील त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. हा कार्यक्रम काहीच महिन्यात प्रेक्षकांचा सगळ्यात आवडता कार्यक्रम बनला. पण या कार्यक्रमात सुरुवातीला सेलिब्रेटींना बोलावणे हे खूपच अवघड काम होते असे कपिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. 

कपिल शर्माने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी ज्यावेळी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी या कार्यक्रमात येण्यासाठी बॉलिवूडमधील कोणताच कलाकार तयार नव्हता. माझ्या कार्यक्रमात हजेरी लावायला तयार होईल असा सेलिब्रेटी शोधणे माझ्यासाठी खूपच कठीण जात होते. पण त्यावेळी बॉलिवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. हे अभिनेते दुसरे कोणीही नसून बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र आहेत. माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहायला ते लगेचच तयार झाले.

आजवरच्या सगळ्याच सेलिब्रेटींनी माझ्या कार्यक्रमात येऊन मजा मस्ती केली आहे. माझ्या कामात मला पाठिंबा दिला आहे. पण धर्मेंद्र यांचे मी उपकार कधीच विसरू शकत नाही. माझ्या कार्यक्रमात कोणीच सेलिब्रेटी येत नव्हते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी माझ्या कार्यक्रमात हजेरी लावून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांच्यानंतर शाहरुख खान, दीपिका पादुकोण, विद्या बालन, इम्रान हाश्मी यांसारखे अनेक सेलिब्रेटी माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. 

कपिल शर्माने गेल्या काही वर्षांत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्सवर पाहायला मिळत होता. पण या वाहिनीमध्ये आणि या कार्यक्रमाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काही वाद झाल्याने हा कार्यक्रम बंद करण्यात आला. कपिलने त्याच टीमसोबत द कपिल शर्मा शो सोनी वाहिनीवर सुरू केला. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :कपिल शर्मा धमेंद्रद कपिल शर्मा शो