Join us

​रात्रीस खेळ चाले मालिका येणार कन्नडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 15:58 IST

​रात्रीस खेळ चाले ही मालिका कन्नड भाषेत येणार असून या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर मराठी मालिकेप्रमाणेच आहे. पण यात सगळे वेगळे कलाकार पाहायला मिळत आहेत. कन्नडमधील कलाकारांना घेऊन या मालिकेचे नव्याने चित्रीकरण करण्यात आले आहे.

रात्रीस खेळ चाले ही मालिका काही महिन्यांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील माधव, निलिमा, दत्ता, सविता, अभिराम, सुषमा, गणेश, नाथा, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडल्या होत्या. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता प्रेक्षकांची ही लाडकी मालिका प्रेक्षकांना कन्नड या भाषेतही पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकरने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने या मालिकेचा ट्रेलर पोस्ट करून त्यासोबत रात्रीस खेळ आता कन्नडमध्ये असे लिहिले आहे. हा ट्रेलर मराठी मालिकेप्रमाणेच आहे. पण यात सगळे वेगळे कलाकार पाहायला मिळत आहेत. कन्नडमधील कलाकारांना घेऊन या मालिकेचे नव्याने चित्रीकरण करण्यात आले आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अजय आणि अॅड. नेने यांचा खून कोणी केला याचे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत कायम राहिले होते. मालिकेची कथा शेवटपर्यंत इतकी चांगली रंगवण्यात आली होती की, प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक संशय घेत होते. मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत प्रेक्षकांना या मालिकेने खिळवून ठेवले. मालिकेच्या शेवटच्या भागात निलिमाने खून केल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेची निर्मिती आणि लेखन संतोष अयोचित यांनी केले होते. या मालिकेत सुरुवातीपासूनच घरातील सगळ्यांवर विश्वासरावचा संशय असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले. पण शेवटच्या भागात निलिमा खुनी असल्याचे सगळे पुरावे विश्वासरावला मिळाले आणि या रहस्यावरचा पडदा उठला होता.  Also Read : प्रल्हाद कुडतरकरचा लग्न सोहळा संपन्न