Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जिजामाता' मालिकेत ही अभिनेत्री साकारतेय 'बिंबाई'ची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 17:56 IST

या अभिनेत्रीनं चित्रपट व नाटक या माध्यमानंतर छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.

उंडगा, युथ ट्यूब यांसारखे चित्रपट असो वा तेरा दिवस प्रेमाचे सारखे प्रसिद्ध नाटक आपल्या प्रत्येक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री शर्वरी गायकवाड आता सोनी मराठी वाहिनीवरील सर्वचर्चित 'जिजामाता' मालिकेत 'बिंबाई'च्या भूमिकेत पहायला मिळत आहे. 

रुपेरी पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने छाप उमटवणाऱ्या शर्वरी हिने आता मालिका क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. कधी निरागस अशी शालेय वयीन मुलगी असो वा कधी कॉलेज मधील अल्लड मुलगी विविध भूमिकांमधून स्वतःला सिद्ध करत आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  

शर्वरी आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजामतांच्या जीवनावर आधारित 'जिजामाता' मालिकेमध्ये बिंबाईची भूमिका साकारीत आहे. शर्वरीने या मालिकेतील तिच्या भूमिकेतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावलेल्या 'यदा कदाचित' या अजरामर नाटकाच्या विसाव्या वर्षी नव्याने निर्माण केलेल्या 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकात देखील शर्वरी झळकत आहे. आता शर्वरी जिजामाता मालिकेतून जिजाऊंच्या काकूची भूमिका रंगवत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवबांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्या राजाचा उल्लेख हा होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊ.

शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा या प्रवासात मोलाचा वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्यजननी जिजामाताच्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज