Join us  

जया प्रदांना 'सुपर डान्सर'मधील जयश्री गोगईने केले प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 8:30 PM

सुपर डान्सरच्या विकेन्डच्या ह्या भागांत बॉलिवूडचे सदाबहार कलाकार जया प्रदा आणि जितेंद्र यांनी हजेरी लावली होती.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर सीझन 3ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमामध्ये  मुलांनी आपल्या नृत्याद्वारे अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे. सुपर डान्सरच्या विकेन्डच्या ह्या भागांत बॉलिवूडचे सदाबहार कलाकार जया प्रदा आणि जितेंद्र यांनी हजेरी लावली होती. शूटिंगच्या दरम्यान, स्पर्धक आणि त्यांचे नृत्यदिग्दर्शक ह्यांनी परीक्षकांना त्यांच्या अभिनव शैलीने प्रभावित केले. 

रोबोटिक्सपासून बॅलेपर्यंत सगळ्या प्रकारांनी प्रेक्षकांवर जादू टाकली. जया प्रदा तर त्यांच्या नृत्याने एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांनी सगळ्यांत लहान आणि उत्साही स्पर्धक असलेल्या कोलकात्याच्या सहा वर्षीय रुपसा बताब्याल हिला एक सुंदर बाहुली भेट दिली. सेटवरील सगळ्यात लहान मुलगी असल्याने ती एवढी खूश झाली की लगेच त्या बाहुलीशी खेळायला लागली. रुपसा ती बाहुली कुणालाच द्यायला तयार नव्हती अगदी तिच्या नृत्य दिग्दर्शकालाही नाही. एवढेच नाही तर देहराडूनच्या ११ वर्षीय अंकित भंडारीचा संघर्ष ऐकून जया प्रदांच्या डोळ्यांत पाणी आले आणि त्यांनी त्याच्या आईच्या प्रयत्नांचे आणि सकारात्मकतेचे कौतुक केले. जयाजींनी त्यांना एक गुलाबी रंगाची एक प्रिंट सिल्क साडी देऊन आश्चर्याचा धक्का दिला. त्याची आई ह्या कृतीने एवढी अचंबित झाली होती की खूप वेळ त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता आणि मग तिने धावत येऊन जयाजींचे पाय धरले. जया प्रदांना आसामच्या ७ वर्षीय जयश्री गोगईनेही खूप प्रभावित केले. तिने तोफा तोफा गाण्यावर बॅले शैलीत नृत्य केले. ती पहिल्यांदाच ह्या शैलीत नृत्य करत होती आणि तिने हा प्रकार फक्त चार दिवसात शिकला. जयश्री फारच गोंडस दिसत होती आणि तिच्या कामगिरीने जयाजींना थक्क केले. त्यांनी तिला ५०० रुपये भेट दिले आणि तिच्या कानाच्या मागे काजळ लावून तिची दृष्ट काढली.जया प्रदा यांनी सांगितले की, "मी हा कार्यक्रम खूप दिवसांपासून बघते आहे. हा मंच म्हणजे नृत्याच्या विकासासाठी एक सुंदर योगदान आहे. ही मुलं एवढी प्रतिभावान आहेत की मलाच त्यांच्याकडून नृत्य शिकावंसे वाटते. त्यांनी जो संघर्ष केला आहे त्यामुळेच ते एवढ्या लहान वयात अशाप्रकारचे यश मिळवत आहेत."            

टॅग्स :सुपर डान्सरजया प्रदाजितेंद्र