Join us  

Exclusive:Bigg Boss12 सुरु होण्याआधी आयर्न मॅन मिलिंद सोमणचा खुलासा,फॅन्सना बसणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:39 PM

Bigg Boss12 Contestant: मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत.

सध्या छोट्या पडद्यावर मराठी बिग बॉसची रंगत संपते न संपते तोच हिंदी 'बिग बॉस १२' व्या सीझनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या शोचे प्रोमोसुद्धा झळकण्यास सुरुवात झाली आहे. दिवसागणिक या शोच्या आगामी सीझनबाबत आणि सहभागी स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम काय असणार याची प्रचंड उत्सुकता आहे.

यंदाच्या १२व्या सीझनमध्ये सेलिब्रिटी कपल्स किंवा जोड्या अशी थीम असेल अशी जोरदार चर्चा आहे. डॅनी आणि माहिका शर्मासह या सीझनमध्ये मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता एंट्री करण्याची शक्यता आहे. मात्र शो सुरु होण्याआधी अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण याने याबाबत एक खुलासा केला आहे. आजवर बिग बॉसच्या निर्मात्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चाच झाली नसल्याचं मिलिंद सोमणने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

बिग बॉस या शोमध्ये आमच्या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.मात्र आजवर बिग बॉसच्या निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारे बोलावणं आलेलं नाही किंवा चर्चाही झालेली नाही. त्यामुळे आमच्या सहभागाच्या चर्चा कुठून सुरु झाल्या हे माहित नाही असा खुलासा मिलिंद सोमणने केला आहे. भविष्यात अशी चर्चा होईल किंवा नाही हेही माहित नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. ५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. मात्र मिलिंदने लोकमतकडे केलेल्या खुलासामुळे रसिकांचा हिरमोड होईल यांत शंका नाही.

सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज,त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया मिळत असल्याचे पाहायला मिळते. अलिबागमध्ये पार पडलेल्या लग्नानंतर अंडरवॉटर रोमान्स मुळेही दोघं खूप चर्चेत होते.

टॅग्स :मिलिंद सोमण बिग बॉस 12