Join us  

Indian Idol 12: सवाई भट्टने केले गरिबीचे नाटक? जुने फोटो पाहून भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 11:36 AM

होय, सवाई भट्टने गरिबीचे नाटक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.

ठळक मुद्देसवाईच्या आवाजाने सध्या अख्ख्या देशाला वेड लावले आहे. काहीच दिवसांत त्याचे असंख्य चाहते बनलेत.

‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन सध्या रंगात आला आहे. नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हे तिघे लोकप्रिय परिक्षक आणि आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे एकापेक्षा एक भारी स्पर्धक यामुळे हा शो चर्चेत आहेत. राजस्थानातून आलेला गोड गळ्याचा सवाई भट्ट याची तर भलतीच चर्चा आहे. तूर्तास हाच सवाई भट्ट एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. होय, सवाई भट्टने गरिबीचे नाटक केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.

 ‘इंडियन आयडल 12’च्या ऑडिशनदरम्यान सवाईने आपली गरिबीची कहाणी ऐकवली होती. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ दाखवून मिळणा-या पैशातून घर चालवत असल्याचा आणि अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याचे त्याने सांगितले होते. त्याची ती कहाणी ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. याच सवाई भट्टचे काही जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि त्यावरून त्याच्या गरिबीच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय.

व्हायरल होत असलेल्या जुन्या फोटोंमध्ये सवाई स्टेजवर परफॉर्म करताना दिसतोय. अनेक ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तो गाताना दिसतोय. हे फोटो पाहिल्यानंतर सवाई प्रोफेशनल सिंगर असल्याचा दावा अनेक नेटक-यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्याने संगीताचे प्रशिक्षण घेतल्याचाही दावा केला जात आहे. ऑडिशनमध्ये मात्र आपण फक्त एक लोककलाकार असल्याचा दावा सवाईने केला होता.

सवाईचे हे फोटो व्हायरल होताच नेटक-यांनी  ‘इंडियन आयडल’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सवाई आणि  ‘इंडियन आयडल ’च्या मेकर्सनी खोटे बोलून प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवला जात आहे. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूड सिंगर सोनू निगम याने एकेकाळी  भारतीय रिअ‍ॅलिटी शोची पोलखोल केली होती. सोनू त्यावेळी खरं बोलला होता, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

सवाईच्या आवाजाने सध्या अख्ख्या देशाला वेड लावले आहे. काहीच दिवसांत त्याचे असंख्य चाहते बनलेत. मात्र त्याच्या या फोटोवरून लोकांचा विश्वास डगमगला आहे.  ‘इंडियन आयडल 12’ने अद्याप याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.

टॅग्स :इंडियन आयडॉल