Join us  

विशेष लेख: ‘ते’ही कलाकारच आहेत... त्यांनाही मान द्या, साथ द्या, विश्वास द्या!!!

By देवेश फडके | Published: May 12, 2022 1:15 PM

मुख्य कलाकारांप्रमाणे त्यांना साथ करणारे साथीदारही तितकीच मेहनत घेत असतात. मात्र, त्यांची अपेक्षित दखलही घेतली जात नसल्याचे चित्र संगीतविश्वात पाहायला मिळते.

अलीकडेच एका वाहिनीवर सुपरस्टार सिंगर या संगीतविषयक रिएलिटी शोचा दुसरा सीझन सुरू झाला. यामध्ये ज्यांना संगीतक्षेत्रातील अत्यल्प अनुभव आहे, अशा कालच्या गायकांना मेंटॉर करण्यात आले आहे. तर संगीत क्षेत्रात दमदार कामगिरी केलेल्या तसेच आपल्या कर्तृत्वाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तीन कलाकारांना मुख्य जजची भूमिका देण्यात आली आहे. या रिएलिटी शोमधील एक स्पर्धक म्हणजे विश्वजा जाधव. विश्वजाचे वडील विजय जाधव याच कार्यक्रमात ढोलकी वादक आहेत. रिएलिटी शो म्हटला की, प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणे आलेच. त्यानुसार, ऑडिशन राऊंडला या कार्यक्रमाच्या स्टेजवर वडील आणि मुलीचा हृद्य प्रसंग दाखवण्यात आला. वडिलांचे संघर्षमय जीवन, मुलीला असलेली कलेची आवड, कोरोना काळ वगैरे गोष्टींची एक एव्ही दाखवण्यात आली. यानिमित्ताने साथीदार कलाकार आणि त्यांची कोरोना काळात झालेली फरफट याचे कल्पनेच्या पलीकडील वास्तव सर्वांनी पाहिले.

साधारणपणे गायनाचा कार्यक्रम असला की, मुख्य गायकासह तबला, हार्मोनियम, तालवाद्य आणि अन्य काही मंडळी स्टेजवर पाहायला मिळतात. शास्त्रीय संगीत कार्यक्रमात केवळ तबला-पेटीवर साथ देण्यासाठी कलाकार असतात. पूर्वीच्या काळी तंबोऱ्याची साथ करतानाही कलाकार पाहायला मिळायचे. मात्र, कालौघात तंबोऱ्यासह ते कलाकारही काळाच्या दृष्टिआड झालेले दिसतात. यानंतर संगीत नाटक, सुगम संगीत, कीर्तन, भजन, दशावतार, ऑर्केस्ट्रासह अनेकविध प्रकारच्या संगीत कार्यक्रमात साथीदार कलाकारांची संख्या वाढत जाते. सर्व जण आपापली कला यथोचितपणे सादर करून रसिकांना पूर्णानंद देण्याचा प्रयत्न करत असतो. 

गेल्या काही दशकांपासून हार्मोनियम, तबला, ढोलकी, पखवाज, मृदुंगासह साइड ऱ्हीदम वाजवणाऱ्या कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. ही अतिशय चांगली बाजू असली, तरी याची दुसरी बाजू ही वेदनादायी, संघर्षमय आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. मुख्य गायक कलाकार आपल्या प्रतिभेवर जशी कला सादर करत असतात, तसेच त्यांना साथ करणारे साथीदारही कलाकारच असतात. तेही आपली प्रतिभा सादर करत असतात. मात्र, साथीदारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आजच्या जाहिरातीच्या युगातही मुख्य गायक कलाकारांची नावे प्रामुख्याने दिली जातात. मात्र, किती जाहिरातींमध्ये साथीदार कलाकारांची नावे दिली जातात? याचे प्रमाणही अतिशय नगण्य असल्याचे दिसते. वृत्तपत्रातील जाहिरातीत जागा, पैसे हा मुद्दा असतो. मात्र, आताच्या सोशल मीडियाच्या जगातही जिथे जागा, पैसे यांचा संबंध नाही, तिथेही साथीदारांची नावे आग्रहाने दिल्याचे पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळात साथीदार कलाकारांची नावे पाहून कार्यक्रमाला जाणाऱ्या रसिकांची संख्या मोठी होती किंवा कार्यक्रमाला गेल्यावर अमूक एक व्यक्ती साथीदार आहे म्हटल्यावर रसिकांना विशेष आनंद होत असे, असे सांगितले जाते. काळ पुढे गेला, तशा या गोष्टी केवळ स्मरणात राहिल्यात, असेच म्हणावे लागेल. साथीदार कलाकांना देण्यात येणारा मान-सन्मान यावरही विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात तालवाद्याशी निगडीत कितीही एप आली, तरी प्रत्यक्षात साथीदारांसोबत कला सादर करणे आणि यंत्रासोबत कला सादर करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, हेही समजून घ्यायला हवे.

मुख्य गायकांप्रमाणे साथीदारही कला शिकण्यासाठी, आत्मसाद करण्यासाठी, त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी तितकाच संघर्ष करत असतात. मात्र, गायक कलाकांरांएवढी प्रसिद्धी, मान, सन्मान, लोकप्रियता किती जणांना मिळते, हा एक अभ्यासाचा विषय आहे. गायक कलाकारांना मिळणारे मानधन आणि साथीदारांना मिळणारे मानधन यात मोठा फरक असतो. त्यात जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, तो फरक एवढा मोठा असतो की, एखादा प्रसिद्ध, लोकप्रिय गायक कलाकार त्या जोरावर बंगले बांधू शकतो. मात्र, त्यालाच साथ करणारा दुसरा कलाकार शहरी भागात चार-पाच खोल्यांचे मोठे घरही घेऊ शकत नाही. याला काही अपवादही निश्चितच आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. एका कार्यक्रमात बोलताना बड्या गायकाने सांगितले होते की, ते घेत असलेले मानधन हे त्यांच्या रियाजाच्या वा साधनेच्या वेळेचा मोबदला असतो. मात्र, या गायकांना साथ करणारे कलाकार त्यांच्या रियाजाचा किंवा साधनेचा वेळ देत नसतात का, हा प्रश्न पडतो. मग असे असेल तर मुख्य गायकाला मिळणारे मानधन आणि साथीदारांना मिळणारे मानधन यात बराच मोठा फरक का दिसतो, असाही एक प्रश्न उपस्थित होतो.

कोणाला किती मानधन मिळते, हा मुख्य विषय नाही. त्यात अनेक वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. मात्र, मुख्य गायक कलाकाराच्या तुलनेत साथीदारांना मिळणारे मानधन अत्यल्प असते, असेच अनेक ठिकाणी पाहायला मिळते. हा रिवाज कुठेतरी बदलला गेला पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवते. कोरोना संकटाच्या भीषण काळात साथीदारांची झालेली फरफट याविषयी जितकी चर्चा होईल, ती जखमेवरची खपली काढण्याप्रमाणेच ठरेल. या कोरोनाच्या काळात लोकप्रिय, प्रसिद्ध कलाकारांनी युट्यूब, फेसबुकसारख्या सोशल मीडियातून आपला प्रसार आणि प्रचार करत पैसे कमावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यांनाच साथ करणाऱ्या कलाकारांचे किती युट्यूब चॅनल सुरू झाले, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किंबहुना शक्य असेल, तिथेही साथीदारांना साथीला घेऊनही युट्यूब, फेसबुकवर कला सादर करण्यात आलेली नाही, असेच दिसले.  

दुसरे म्हणजे आपल्या देशात शासन, प्रशासनासह हजारो संस्था पुरस्कार देत असतात. यामध्ये वाहिन्याही मागे नाहीत. या सर्व गोतावळ्यात साथीदार कलाकारांचा विशेष विभाग करून दिले जाणारे पुरस्कार किती, हाही एक संशोधनाचा विषय आहे. पद्मश्रीपासून ते विशिष्ट वाहिनीच्या जीवनगौरव पुरस्कारांच्या मांदियाळीत एकाही साथीदाराला पुरस्कार दिल्याचे स्मरणात नाही. काही लायकी नसलेल्यांना एखादा बडा पुरस्कार प्रदान केला जातो, तेव्हा त्या साथीदार कलाकाराच्या मनाला होणाऱ्या वेदना या न कल्पलेल्याच बऱ्या, असे म्हणावे लागेल. तंत्रज्ञांपासून ते कवी, संगीतकारांपर्यंत अनेकांना पुरस्कारांनी गौरवले जाते. मात्र, साथीदारांना तो मान मिळत नाही, हेच खरे. 

सुपरस्टार सिंगरच्या सिझन २ च्या त्या भागात दाखवलेल्या प्रसंगातून साथीदार कलाकारांची वेदना, धडपड, त्याग, संघर्ष हेच प्रकर्षाने समोर आले. अशा रिएलिटी शोच्या कार्यक्रमात तर साथीदार कलाकार इतरांच्या तोडीचीच मेहनत करताना दिसतात. सतत गायले की, त्याचा एक परिणाम स्वरयंत्र, आवाजावर होत असतो. तसाच परिणाम सातत्याने वाद्य वाजवत राहिले की, त्या साथीदार कलाकारावर होत असतो. आताच्या घडीला असे हजारो साथीदार आहेत, ज्यांनी केवळ आपल्या कलेसाठी संपूर्ण जीवन वाहून घेतले. मात्र, केवळ उपेक्षाच पदरात पडली. यानिमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते, तेही कलाकारच आहेत, त्यांना साथ द्या, मान द्या आणि पुढे जाण्याचा विश्वास द्या...!!!

- देवेश फडके 

टॅग्स :संगीतटेलिव्हिजन