अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) सातत्याने चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्या सोशल मीडियावरील रिल किंवा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येतात. वयाची पन्नाशी ओलांडलेली असतानाही त्या या वयात इतक्या फिट आहेत. त्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच कौतुक करताना दिसतात. त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी 'सून लाडकी सासरची' या त्यांच्या पहिल्या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांना आलेला अनुभव ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला. त्यांनी लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या नारकर यांनी अशोक सराफ यांच्यासोबत एक सिनेमा केला, त्यावेळचा एक किस्सा सांगितला. ज्या सिनेमात ऐश्वर्या नारकर यांनी अशोक मामांसोबत स्क्रिन शेअर केलेली, त्या सिनेमात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारलेली.
"तेव्हा मी अगदीच नवखी होते आणि..."
ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, "सून लाडकी सासरची' हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्यात अशोक मामांनी माझ्या सासऱ्यांची भूमिका केली होती. या चित्रपटावेळी मामांनी मला खूप मदत केली. तेव्हा मी अगदीच नवखी होते आणि कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. इंडस्ट्रीत येऊन मला अगदी एक वर्षच झालं होतं. त्याआधी मी नाटकात काम करत होते. त्यामुळे मला तेवढा अनुभव नव्हता. तेव्हा कोणताही सीन कधीही केला जायचा, त्यामुळे अभिनयातील ते सातत्य कायम ठेवता येईल का? असा विचार माझ्या मनात यायचा. त्यावेळी सेटवर मामांशिवाय काही इतर लोकांनीही मला मदत केली होती."