Join us

‘निम्की मुखिया’चा निडर हिरो- भूमिका गुरुंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:37 IST

‘निम्की मुखिया’ मालिकेची कथा वेगात पुढे सरकत असून त्यातील भूमिका गुरुंगने साकारलेली निम्की मुखियाची भूमिका प्रेक्षकांना सतत काहीतरी नवे ...

‘निम्की मुखिया’ मालिकेची कथा वेगात पुढे सरकत असून त्यातील भूमिका गुरुंगने साकारलेली निम्की मुखियाची भूमिका प्रेक्षकांना सतत काहीतरी नवे देत असते. भूमिकाची ही पहिलीच मालिका असली, तरी तिने आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहोत, ही गोष्ट वारंवार सिध्द करून दाखविली आहे. यातील तिच्या विक्षिप्त तरीही बहारदार व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे.मालिकेच्या आगामी भागात ती बर्फ आणि आगीशी खेळ करून एकाचा जीव वाचविते आणि आपण किती निडर आहोत, ते दाखवून देते. या मालिकेत जनावरांच्या उधळलेल्या कळपामुळे काही गावकरी पाण्यात पडून वाहून जाण्याचा धोका निर्माण होतो, परंतु निम्की त्यांना बुडण्यापासून वाचविते, असे दाखविण्यात आले आहे.या प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी भूमिकाला तब्बल 24 तास पाण्यातच राहावे लागले. यासंदर्भात भूमिकाने सांगितले की तिला पाण्याची भीती वाटते. परंतु तिने ‘स्टार भारत’ वाहिनीचे ध्येय ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ हे डोळ्यांपुढे ठेवून हा प्रसंग वास्तववादी पध्दतीने साकारला.अनेकदा टीव्ही मालिकांतील अभिनेत्री या वास्तववादी प्रसंग साकारण्यासाठी आपल्या मनातील सारी भीती व शंका दूर सारून असे प्रसंग साकारताना दिसत आहेत. त्या अर्थाने त्याच ख-या ‘नायक’ बनल्या आहेत. भूमिका सांगते, “मालिकेतल्या जनावरांच्या कळपाच्या प्रसंगाचं चित्रीकरण करताना माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. आम्ही जिथे चित्रीकरण करीत होतो, ती जागा चिखलाने भरलेली होती. तरीही मी त्यात राहून हे चित्रीकरण पूर्ण केलं. जनावरांच्या उधळण्याचा प्रसंग वास्तव होता आणि तो सारा प्रसंग उभा करताना मला खूप मजा आली.”या मालिकेत अलीकडेच एक सायकल शर्यतीचा प्रसंग होता. आपली अतिउत्साही निम्की हिनेही या शर्यतीत भाग घेतला; इतकेच नव्हे, तर ती जिंकून ‘स्कूटी’ हे पहिले बक्षीसही पटकाविले.आपल्याला सुयोग्य वर मिळावा, यासाठी निम्कीच्या दृष्टीने ‘स्कूटी’ जिंकणे महत्त्वाचे होते.या सायकल शर्यतीच्या प्रसंगात तिला प्रत्यक्ष सायकल अतिशय वेगात चालवावी लागली होती. त्यासाठी तिने तब्बल एक आठवडाभर वेगात सायकल चालविण्याचा सराव केला. सराव करताना एकदा तिचा सायकलवरील ताबा सुटला आणि ती त्यावरून खाली पडली आणि तिने स्वत:ला जखमी करून घेतले. यावेळी तिच्या गुडघ्याला जोरदार मार बसला आणि तिला नीट चालताही येत नव्हते. तिला तेव्हा प्रथमोपचारांची तातडीची गरज होती.मालिका किंवा चित्रपटांत अभिनेते हे महान आणि भव्य व्यक्तिरेखा जरी साकारीत असले, तरी वास्तवात तेसुध्दा सामान्य माणसेच असतात आणि कधी कधी त्यांनाही सेटवर अपघातांचा फटका बसू शकतो. भूमिकानेही या अपघातानंतर काही काळ विश्रांती घेतली आणि नंतर ती पुन्हा सायकल चालविण्याच्या सरावासाठी उभी राहिली. या प्रसंगामुळे काहीशा हादरलेल्या भूमिकाने सांगितले, “थोडी कळ सोसल्याशिवाय काही साध्य होत नाही. मी जखमी जरूर झाले, पण माझ्यातील उर्मी संपली नव्हती. मला थरारक, धाडसी प्रसंग साकारावयास फार आवडतात. हे असे अपघात होतच असतात. ते आमच्या कारकीर्दीचाच एक भाग आहेत. मला जखम झाली आणि त्यामुळे मला वेदनाही झाल्या, पण आता मी सुधारत आहे. सायकल शर्यतीच्या प्रसंगाचं चित्रीकररण करताना मला जो काही आनंद झाला, त्यापुढे या किरकोळ दुखापतींचं काहीसुध्दा महत्त्व नाही. प्रेक्षकांनाही हा प्रसंग पाहताना मजा येईल,असे मत व्यक्त केले होते.”