Join us  

'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 2:43 PM

सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे.

 'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी झी युवाने 'सूर राहू दे' ही नवी मालिका नुकतीच सादर केली आहे. १ ऑक्टोबर पासून ही मालिका प्रेक्षकांना झी युवा या वाहिनीवर ७ वाजता पाहायला मिळत आहे.

'सूर राहू दे' ही दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा आहे. गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरी एक साध्या-सरळ, भावनांना महत्त्व देणाऱ्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करिअर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करत आहे.

 'सूर राहू दे' या मालिकेत गौरीची व्यक्तिरेखा ही एका स्वावलंबी मुलीची आहे, जिची स्वतःची 'आग्रह' नावाची खानावळ आहे. तिच्या आई वडिलांच्या पश्चात आरोहीच या खानावळीचा सगळा कारभार पाहत आहे. सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ऑनस्क्रीन जेवण करणाऱ्या गौरीला खऱ्या आयुष्यात पाककलेत किती रस आहे हे सांगताना तिने तिचा पहिला जेवण बनवतानाचा अनुभव शेअर केला. तिच्या पाककला कौशल्याबद्दल बोलताना गौरी सांगते, "मी कामानिमित्त एकटी राहत असल्यामुळे मला स्वतःचे जेवण बनवण्याची सवय आहे, पण मी फक्त शाकाहारी जेवण बनवते. जेवण बनवायची इतकी आवड नाही आहे पण माझ्या हातचे पदार्थ खाऊन मला खूप जण म्हणतात की, माझ्या हाताला माझ्या आईच्या हाताची चव आहे. मला प्रसादाचा शिरा बनवायला खूप आवडतो. मी सर्वात पहिल्यांदा दालखिचडी बनवली होती आणि त्याचा अनुभव देखील भन्नाट होता."

'सूर राहू दे' ही मालिका नुकतीच सुरू झाली असली तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

  

टॅग्स :गौरी नलावडेसूर राहू दे